जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी रविवारी एक त्रिसदस्यीय केंद्रीय समिती जळगावात दाखल झाली. या समितीने जळगावातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेली ठिकाणे, प्रतिबंधित क्षेत्र तसेच कोविड रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करत चाचपणी केली. यावेळी कोविड रुग्णालयासह आरोग्य यंत्रणेतील अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा समोर आला. त्यानुसार, याबाबत केंद्राकडे अहवाल सादर करणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली आलेल्या त्रिसदस्यीय समितीत कुणाल कुमार यांच्यासह नागपूर एम्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद कुशवाह, सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रीकांत बॅनर्जी यांचा या समितीत सहभाग होता. समितीने शहरातील अयोध्यानगर परिसरातील कौतिक नगर व शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट या भागात पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली. समितीच्या सदस्यांनी काही नागरिकांशीदेखील थेट संवाद साधला. त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रशासनाची भूमिका याबाबत सविस्तर नोंदी घेतल्या. काही ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डातील आरोग्यांच्या समस्या समितीपुढे मांडल्या.
शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी केल्यानंतर केंद्रीय समितीने कोविड रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या वॉर्डात जाऊन पाहणी केली. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या दालनात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते.
कोविड रुग्णालयात अधिष्ठातांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीत केंद्रीय समितीने उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी स्थानिक प्रशासनाने मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा प्रामुख्याने केंद्रीय समितीच्या सदस्यांसमोर उपस्थित केला. त्यावर मनुष्यबळाचा प्रश्न केंद्र सरकारकडे मांडणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. सद्यस्थितीत प्रतिबंधित क्षेत्रात किती रुग्ण आहेत, किती चाचण्या झाल्या आहेत, किती चाचण्या होत आहेत, सर्वेक्षण किती झाले आहे, अशी विचारणा कुणाल कुमार यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केली. दरम्यान, अन्य व्याधी असलेल्या रुग्णांकडे 14 दिवसांनंतरही लक्षात ठेवा, सर्वेक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करा, अशा महत्त्वपूर्ण सूचनादेखील त्यांनी दिल्या.