जळगाव - लॉकडाऊनमध्ये तब्बल दीड महिन्यानंतर जिल्ह्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. मात्र, याठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना निकषांचे कारण पुढे करत नकार दर्शवला जात आहे. तर, जिनर्सकडून कोणत्याही निकषांविना कापूस खरेदी केली जात आहे. काही जिनर्स शेतकऱ्यांच्या नावावर नोंदणी करून, आपला माल सीसीआयच्या केंद्रावर विक्री करत आहेत. जिनर्सच्या या हेराफेरीमुळे गरजू शेतकऱ्यांना आपला मालच विक्री करता येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. दुसरीकडे, या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर दुर्दैवी वेळ आली आहे. कापसाला भाव चांगला मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल सुरुवातीला विक्रीसाठी आणला नव्हता. पुढे लॉकडाऊन झाल्यामुळे जिनींग व शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद झाले. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. आता कापूस खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालापेक्षा जिनर्स व व्यापाऱ्यांचाच माल जास्त खरेदी केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. सीसीआयचे अधिकारी आणि जिनर्समध्ये साटेलोटे असल्याने हा प्रकार सुरू आहे.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांकडून माल खरेदी असताना अनेक खासगी जिनर्स व व्यापाऱ्यांनी ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांचा माल कमी भावात खरेदी केला. लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व जिनींग व शासकीय खरेदी केंद्र देखील बंद झाले. तब्बल दीड महिन्यानंतर शासकीय कापूस खरेदी सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाप्रमाणे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात येतो. अशा परिस्थितीत ज्या जिनींग व्यावसायकांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून ३५०० ते ४ हजार रुपयांप्रमाणे प्रतिक्विंटल माल खरेदी केला होता. तेच जिनींग व्यावसायीक व व्यापारी सीसीआयच्या केंद्रावर आपला माल आता विक्रीसाठी आणत आहेत.