जळगाव -शहरातील पिंप्राळा हुडकोतील एका तरुणावर तीन ते चार जणांनी तलवार, कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 13 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी दोन दिवसांनी म्हणजेच आज (दि. 15 ऑक्टोबर) चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मुख्य संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
जळगावात पूर्ववैमन्यस्यातून तरुणावर तलवार हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा, मुख्य संशयित अटकेत
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडकोतील एका तरुणावर तीन ते चार जणांनी तलवार, कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हे दाखल करुन मुख्य आरोपीला अटक केली आहे.
सुनील पंडित भालेराव (रा. पिंप्राळा हुडको, जळगाव), असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुनील भालेराव हा त्याच्या आई व बहिणीसह पिंप्राळा हुडकोत राहतो. मंगळवारी मध्यरात्री मागील भांडणाच्या कारणावरून संशयित आरोपी मिलिंद आखाडे, पंकज आडागे, पंकज उर्फ पंक्या रिक्षावाला, वीरन खैरनार या चौघांनी सुनीलला बेदम मारहाण करत त्याच्यावर तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर सुनीलला त्याच्या नातेवाईकांनी शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर आयुर्वेद महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी आज (गुरुवार) रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मिलिंद आखाडे, पंकज आडागे, पंकज उर्फ पंक्या रिक्षावाला, वीरन खैरनार या चौघांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पथकाने मुख्य संशयित मिलिंद आखाडे याला अटक केली आहे.