जळगाव -धावत्या कारमध्ये चालकास हृदयविकाराचा झटका आल्याने कारने समोर चालत असलेले दोन पादचारी, एक दुचाकीस्वार व एका कारला पाठीमागून धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि. 15 ऑक्टोबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुसुंबा गावाजवळील महामार्गावर घडली आहे. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.
औरंगाबादकडून जळगावकडे येणाऱ्या कारमधील (एमएच 12 क्युएफ 1252) चालकास हृदयविकाराचा झटका आला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अत्यवस्थ झालेल्या या चालकाने समोर चालत असलेल्या दोन पादचाऱ्यांसह दुचाकीस जोरदार धडक दिली. यात तीघे जखमी झाले. यानंतरही कार पुढे चालत राहिली. अखेर समोर चालत असलेल्या (एमएच 14 डीएन 9843) या कारला मागून धडक दिल्यामुळे ही कार थांबली. त्या कारमधीलही एकजण जखमी झाला आहे.