जळगाव - भर रस्त्यावर कार शिकणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. शहरातील काव्यरत्नावली चौकात कार शिकत असताना नियंत्रण सुटल्याने वेगाने कार चौकातील झाडावर धडकल्याची घटना आज शुक्रवार २५ रोजी घडली. सुदैवाने वेळीच कारमधील एअरबॅग उघडल्याने कारमधील तरुणांना दुखापत झाली नाही. मात्र कार संपूर्ण चक्काचूर झाली असून नुकसान झाले आहे. दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच ही कार खरेदी केली असल्याचीही माहिती मिळाली आहे.
कुठलीही दुखापत नाही
शहरातील नंदनवन कॉलनी येथे आर. बी. हिंगणेकर हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलाचा फोटोग्राफीचा व्यवसाय असून काव्यरत्नावली चौकात एचडीएफसी बँकेच्या बाजुला ऑफिस आहे. गुरुवारी ऑफिसमध्ये रात्री उशीरापर्यंत काम सुरू होते. यादरम्यान हिंगणेकर यांचा मुलगा रक्षण हा शिकण्यासाठी घरून त्यांची (क्रमांक एम. एच. १९ सी. झेड. १५३२) ही कार घेऊन आला होता. शुक्रवारी पहाटेच्या उठल्यानंतर रक्षण हा त्याच्यासोबतच्या मित्रांसोबत तो काव्यरत्नावली चौक रस्त्यावर कार शिकत होता. शिकताना एचडीएफसी बँकेसमोर रक्षणचा पाय अचानक ब्रेक रून रेसवर गेला व कारवरील नियंत्रण सुटून भरधाव कार ही काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेलगत असलेल्या वृक्षावर जाऊन धडकली. दरम्यान धडक देताच कारमधील एअरबॅग उघडली त्यामुळेच कारमधील रक्षणसह त्याचे दोघे मित्र यांना कुठलीही दुखापत झाली नाही. कारमधून बाहेर उतरून रक्षण याने ही घटना त्याच्या वडिलांना कळविली.