जळगाव- धरणगाव शहराजवळ ब्रेक फेल झाल्याने एसटी बसचा अपघात झाला. ही घटना आज (बुधवारी) दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी धरणगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा-नागरिकत्व विधेयकावरुन विधानसभेत पुन्हा गदारोळ; सुधीर मुनगंटीवार आक्रमक
अमळनेर एसटी आगाराची (एम. एच. 14 बी. टी.1330) अमळनेर-जळगाव ही बस जळगाव येथून अमळनेरला परत येत होती. दरम्यान, धरणगाव शहराजवळील जिनिंगजवळ बसचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात बसमधील 10 ते 12 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर नागरिकांसह इतर वाहन चालकांनी धाव घेत मदतकार्य केले.
तर घडला असता अनर्थ-
बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे बस अनियंत्रित झाली होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला एका मोठ्या खड्ड्यात कोसळली. हा खड्डा राहिला नसता तर बस थेट एका विद्युत रोहित्रावर जाऊन आदळली असती. त्यात बसमध्ये विजेचा प्रवाह उतरून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने बस विद्युत रोहित्रावर जाऊन आदळली नाही.