जळगाव - शहरातील शनिपेठ भागातील 17 नंबर शाळेसमोरील एक दुमजली इमारत कोसळली. ही दुर्घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत इमारतीतील 6 जण बचावले. मात्र, संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, कोसळलेल्या इमारती शेजारी एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने ही दुर्घटना घडली.
जळगावात दुमजली इमारत कोसळली, सुदैवाने 6 जण बचावले! - दुमजली इमारत कोसळली
जळगाव शहरातील शनिपेठ भागात एक दुमजली इमारत कोसळली. कोसळलेल्या इमारती शेजारी एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने ही दुर्घटना घडली.
जळगाव शहरातील शनिपेठ भागात असलेल्या 17 नंबर शाळेसमोर रमेश बाबुराव पाटील हे दुमजली इमारतीत आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होते. 1965 पासून ते या इमारतीत राहत होते. गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास इमारतीची उजव्या बाजूची भिंत ढासळली. त्यामुळे संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाली. सुरुवातीला इमारतीची भिंत कोसळल्यानंतर पत्रे पडण्याचा जोरात आवाज झाला. त्यामुळे वरच्या मजल्यावर झोपलेले पाटील कुटुंबीय जागे झाले. इमारत कोसळणार असल्याची जाणीव होताच ते घराबाहेर पडले. मात्र, खालच्या मजल्यावर असलेले रमेश पाटील यांच्या आई व मुलगा हे इमारत कोसळण्यापूर्वी बाहेर पडू शकले नाही. ते इमारत कोसळल्यानंतर आतमध्ये ढिगाऱ्यात अडकले. या घटनेनंतर शनिपेठ भागातील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेली वृद्धा व तरुणाला शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.
'या' कारणामुळे घडली घटना -
रमेश पाटील यांच्या दुमजली इमारतीच्या शेजारी एक जीर्ण इमारत होती. ती इमारत एका व्यक्तीने विकत घेतली. त्यानंतर जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. इमारतीच्या पायाचे बांधकाम करण्यासाठी 10 ते 12 फूट खोल खोदकाम करण्यात आले होते. खोदकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने रमेश पाटील यांच्या इमारतीची भिंत कमकुवत झाली होती. याच कारणामुळे त्यांच्या इमारतीची भिंत ढासळली आणि रमेश पाटील यांची संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. शेजारची इमारत पडल्यानंतर आपल्या इमारतीला धोका असल्याची पूर्वकल्पना आपण संबंधित व्यक्तीला दिली होती. परंतु, त्याने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप रमेश पाटील यांनी केला आहे.
संसार आला उघड्यावर -
रमेश पाटील यांच्या मालकीची दुमजली इमारत कोसळल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू व साहित्य अडकून पडले आहे. संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हेही वाचा -राष्ट्रीय शिक्षण दिन : शिक्षणाला वय नसतं, आजाबाईंची शाळा चालवणारे योगेश बांगर यांच्याशी विशेष बातचीत