जळगाव - पूर्ववैमनस्यातून एका तरुण वाळू व्यावसायिकावर दोन जणांनी चॉपरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास शहरातील दादावाडी परिसरात घडली. अनिल एकनाथ नन्नवरे (वय २७, रा. निमखेडी, जळगाव) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अतिरक्तस्त्राव झाल्याने अनिलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जळगावात वाळू व्यावसायिकावर चॉपरने वार; हल्ल्याचे केले मोबाईल शुटींग - पोलिसांचा प्राथमिक तपास
शहरातील निमखेडी परिसरात राहणारा अनिल नन्नवरे याचे स्वत:चे ट्रॅक्टर असून त्या सहाय्याने तो वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतो. काल (मंगळवारी) सायंकाळी गणेश कॉलनीत विशाल व डेम्या नावाच्या तरुणांशी अनिलचे वाद झाले होते. याच वादातून आज दुपारी अनिलवर प्राणघातक हल्ला झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

शहरातील निमखेडी परिसरात राहणारा अनिल नन्नवरे याचे स्वत:चे ट्रॅक्टर असून त्या सहाय्याने तो वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतो. अनिलचे गेल्या काही दिवसांपूर्वी दादावाडी, निमखेडी, खोटेनगर परिसरातील काही तरुणांशी वाद झाले होते. काल (मंगळवारी) सायंकाळी गणेश कॉलनीत विशाल व डेम्या नावाच्या तरुणांशी अनिलचे वाद झाले होते. त्यावेळी काही जणांनी मध्यस्थी केल्याने वाद शमला होता. परंतु, याच वादातून आज दुपारी अनिलवर प्राणघातक हल्ला झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
वार करतानाचे केले व्हिडिओ शुटींग -
आज बुधवारी दुपारी अनिल नन्नवरे हा दादावाडी परिसरातून (एमएच १९ बीएस १३७) क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी विशाल, डेम्या व त्यांच्या एका साथीदाराने अनिलला रस्त्यात अडवले. यानंतर डेम्या, विशाल या दोघांनी चॉपरने अनिलवर वार केले. त्यांच्या सोबत असलेल्या साथीदाराने या मारहाणीचे मोबाईमध्ये व्हिडिओ शुटींग केले. दोघांनी अनिलवर चॉपरने पोटावर, हनुवटीवर सपासप वार केले. यात अनिलचे दोन्ही हाताचे पंजे, मनगट देखील कापले गेले आहे. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्यानंतर तिन्ही मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला.
आतड्यांना झाली गंभीर दुखापत -
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अनिल याने मोठ्या भावास फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर काही मिनिटातच निमखेडी येथील तरुणांनी घटनास्थळी येऊन अनिलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हल्लेखोरांनी अनिलच्या पोटात चॉपर खुपसल्यामुळे त्याच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
घटनास्थळी तणाव -
या हल्ल्यामुळे जखमी अनिलच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. रुग्णालयात आणल्यानंतर देखील त्याच्या शरिरावरील मारहाणीच्या जखमांमधून रक्त वाहत होते. घटनास्थळी देखील रक्ताचा सडा पडला होता. घटनेनंतर या परिसरात गर्दी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.