जळगाव- वडील आईला सातत्याने शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याने दोन मुलींनी आई, भाऊ आणि एका दीड वर्षांच्या बालिकेसह स्वतःला सात दिवस बंगल्यात कोंडून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील रणछोडदास नगरातील ही धक्कादायक घटना घडली.
बाप करायचा आईचा अनन्वित छळ; मुलांनी आईसह स्वतःलाही घेतले कोंडून दिनकर रामदास पाटील (वय ६२) यांची एमआयडीसीत रेणुका इंजिनिअर्स नावाची कंपनी आहे. ते पत्नी वैशाली, मुलगा उमाकांत व मुलगी रेणुका यांच्यासह रणछोडदास नगरातील बंगल्यात राहतात. त्यांची मोठी विवाहीत मुलगी राजश्री चव्हाण ही पुण्याला राहते. तिचे वडील गेल्या ३० वर्षांपासून आईला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. या प्रकाराला कंटाळून २ जूनला वैशाली पाटील, रेणुका, उमाकांत व राजश्री यांनी दिनकर पाटील यांना घरातून बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी दरवाजाला आतून कुलूप लावून स्वतःला कोंडून घेतले. ४ जूनपासून त्यांनी अन्नत्याग केला. यादरम्यान केवळ राजश्री यांची दीड वर्षांची मुलगी आर्या हीलाच जेवन दिले जात होते. अन्नत्याग केल्यामुळे सर्वजण अशक्त झाले आहेत.
पत्नी, मुली, मुलगा घरात घेत नसल्यामुळे दिनकर पाटील हे कंपनीतच झोपत होते. ११ जूनला त्यांनी घरी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील सदस्यांनी दरवाजा उघडला नाही. आतून काही प्रतिसाददेखील दिला नाही. पाटील यांनी केलेले फोनदेखील उचलले नाही. दरवाजाच्या बाहेर पाच-सहा दिवसांचे वृत्तपत्रदेखील पडून होते. हे पाहून पाटील माघारी परतले. अखेर त्यांनी गुरुवारी थेट न्यायालय गाठले.
न्यायाधीश अक्षी जैन यांच्या न्यायालयात त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून कुटुंबीयांची माहिती दिली. कुटुंबीयांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले असून त्यांची सुटका करावी तसेच त्यांच्या जिवितास धोका आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. न्यायालयाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन एमआयडीसी पोलिसांना आदेश केले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी घरात स्वतःला कोंडून घेणाऱ्या चौघांची सुटका केली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच न्यायालयाने सर्वांचे जबाब नोंदवण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले.