जळगाव -पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका साडेतीन वर्षाच्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना भुसावळ शहरातील जुना सातारा भागात शनिवारी घडली. वेदांत अनिल मालखेडे असे मृत मुलाचे नाव आहे. अनिल मालखेडे यांना वेदांत हा एकुलता एक मुलगा होता.
पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ला; जखमी बालकाचा अखेर मृत्यू मृत वेदांत हा जुना सातारा भागातील कोळी वाड्याजवळ घराच्या ओट्यावर आजीसोबत बसलेला होता. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने वेदांत त्या चेहऱ्यावरच हल्ला केला. ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी घडली होती. तेव्हापासून त्याची तब्बल १६ दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, शनिवारी अखेर त्याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला; पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
नगरपालिकेच्या दवाखान्यात इलाज करून त्यास रेबिज आणि टीटीचे इंजेक्शन दिले. वेदांत याच्या गालावर सात खोलवर जखमा होत्या, असे वडील अनिल मालखेडे यांनी सांगितले. पुढील उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मुलांची प्रकृती पाहिजे तशी ठीक होत नसल्याने त्यास खासगी दवाखान्यात नेले. मात्र, वेदांतची तब्बेतीत काही फरक पडत नव्हता. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तपासणीनंतर डॉक्टरांनी वेदांतला मृत घोषित केले. या घटनेनंतर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोकाट कुत्र्यांच्या उच्छादासंदर्भात नागरिक अनेक तक्रारी करतात. मात्र, पालिका काहीएक उपाययोजना करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.