जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार भावंडांच्या हत्याकांडाची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतली आहे. अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंत असलेल्या या हत्याकांडाचा तपास जळगाव पोलीस दलाने अतिशय नियोजनबद्ध व शास्त्रोक्त रितीने करत आरोपी निष्पन्न केले होते. याच तपासाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व्हावी, या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्रालयाने या हत्याकांडाची अभ्यासासाठी निवड केली. दरम्यान, या हत्याकांडाचे प्रेझेंटेशन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडेंनी केले. यामुळे जळगाव पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे देशभर गाजलेल्या बोरखेडा हत्याकांडाच्या तपासाची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतल्याने जळगाव पोलीस दलाच्या दृष्टीने ही मानाची बाब मानली जात आहे. देशभरातील घटनांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तपासाची दिशा मिळावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातर्फे ही घटना अभ्यासासाठी निवडण्यात आली होती. जागतिक महिला दिनानिमित्त दिल्लीत आयोजित वेबिनारमध्ये डॉ. प्रवीण मुंडे व तपासाधिकारी कुमार चिंथा यांनी पीपीटी सादर केले. भौतिक व शास्त्रीय पुराव्यांवर दिला होता भर-
बोरखेडा हत्याकांडाची घटना घडल्यानंतर या प्रकरणात तपास कशा रितीने केला, याची माहिती प्रेझेंटेशनमध्ये देण्यात आली. अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ट तपास असल्याने दोषींना शिक्षा होत असताना, निर्दोष व्यक्ती यात गोवला जाऊ नये, याची विशेष खबरदारी या गुन्ह्यात घेण्यात आली होती. या घटनेत सुरुवातीला चार आरोपींची नावे आली. परंतु, शेवटी तपासात तांत्रिक व शास्त्रीय पुराव्यांची जोड मिळाल्यावर नेमका आरोपी निष्पन्न करून त्याला पोलिसांनी अटक केली. सलग चार दिवस पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी बोरखेडा व रावेरात ठाण मांडून तेथे नियंत्रण कक्ष तयार केला होता. मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक सतत संपर्कात राहून आढावा घेत होते. क्लिष्ट असलेला तपास चार दिवसात करून आरोपी निष्पन्न करण्यात आला होता.