जळगाव - कोरोनाच्या संकट काळातही जिल्ह्यातील बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयातील ओपीडी बंद आहे. त्यामुळे नागरिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बोदवड तालुक्यात आतापर्यंत ४२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असताना देखील येथील ग्रामीण रुग्णालयात ५ जूनपासून म्हणजे तब्बल बावीस दिवसांपासून एमबीबीएस डॉक्टर नसल्याने दररोज हाेणारी ओपीडी बंद आहे.
बोदवड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने खेड्यापाड्यातील नागरिक दररोज उपचारासाठी येथील रुग्णालयात येतात. मात्र, डॉक्टरच नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागते. सध्या काेराेना संसर्ग वाढत असल्याने अनेक खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांपुढे कोणाकडून उपचार घ्यावे, हा पेच उभा राहताे. येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज २०० ते २५० रुग्ण उपचारासाठी येतात. याठिकाणी ३० आरोग्य कर्मचारी आहेत. पण एमबीबीएस डॉक्टर नसल्याने सध्या डॉक्टर हजर होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. शहरात व ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. सध्या तालुक्यात ४२ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.