जळगाव -शहरासह जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा मोठ्या प्रमाणावर घटला असून, रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. कोरोनामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्याकडे पाठ फिरवली आहे. याशिवाय सेवाभावी संघटना, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्यांनी तसेच राजकीय पक्षांच्या वतीने होणाऱ्या रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे रक्ताचा पुरवठा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत मागणी जास्त आणि उपलब्धता कमी झाल्याने ही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने केले जात आहे.
मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये परिस्थिती बदलली आहे. आरोग्य क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मध्यंतरी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सर्वच हालचाली मंदावल्या होत्या. पण, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत अपघातांचे काहीअंशी प्रमाण वाढले आहे. परिणामी नॉन कोविड रुग्णांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत रक्ताची मागणी वाढली आहे. एकीकडे रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे, रक्ताची उपलब्धता कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यभर हीच स्थिती असून, रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने रक्तपेढ्यांकडून रक्तदानाचे आवाहन केले जात आहे.
जिल्हाभरात भासतोय रक्ताचा तुटवडा
जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मर्यादित साठा उपलब्ध आहे. जळगाव शहर आणि परिसर मिळून पाच रक्तपेढ्या आहेत. याशिवाय जिल्ह्यात अमळनेर, चाळीसगाव, भुसावळ, चोपडा याठिकाणी खासगी रुग्णालयांच्या रक्तपेढ्या आहेत. या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये आजच्या घडीला मर्यादित स्वरुपाचा रक्तसाठा शिल्लक आहे. निम्म्याहून अधिक साठा घटला आहे. जळगाव शहरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटी, माधवराव गोळवलकर, रेडप्लस, जिल्हा रुग्णालय तसेच डॉ. उल्हास पाटील रुग्णालय या पाच रक्तपेढ्या गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, कोरोनामुळे आता या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये तर एक किंवा दोनच दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही रक्तपेढी जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्तपेढी आहे. या रक्तपेढीच्या वतीने नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. पण, आता कोरोनामुळे या रक्तपेढीलाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रक्तदात्यांनी समोर येण्याची गरज