जळगाव -रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील भुसावळ शहरात असलेल्या ओम पॅथॉलॉजी लॅबच्या मालकासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे अव्वाच्या सव्वा दरात रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करत होते. विशाल शरद झोपे (वय 28, रा. भुसावळ) आणि गोपाल नारायण इंगळे (वय 18, रा. मानमोडी, ता. बोदवड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. विशाल झोपे हा लॅबचा मालक आहे.
असे आले जाळ्यात
राज्यभर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची साठेबाजी आणि काळाबाजार होत आहे. अशा परिस्थितीत बुधवारी (आज) एका अज्ञात व्यक्तीने विशाल झोपे व गोपाल इंगळे या दोघांकडून एमआरपीपेक्षा जास्त किंमतीने रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घेतले. त्यानंतर त्या व्यक्तीने ही माहिती भुसावळ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी लागलीच ओम पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला. त्यात दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे दोन वेगवेगळ्या कंपनीचे 5 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळून आले. हे इंजेक्शन त्यांनी दुसऱ्या व्यक्तीकडून 20 हजार रुपयांत घेतले होते. हेच इंजेक्शन ते नफा कमवण्यासाठी 20 हजारांपेक्षा अधिक किंमतीत विकत होते. अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.