जळगाव -एकाच घरात दोन पदे नको म्हणून राज्यसभेच्या उमेदवारीची आपल्याला अपेक्षा नव्हती. ती उमेदवारी आपल्याला मिळणार नाही, हे माहिती होतेच. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला विधान परिषदेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्याची प्रतीक्षा आहे, अशी माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. ते येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणूक आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली.
राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांच्यासह एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा गेल्या आठवड्यात होती. यात खडसे यांना उमेदवारी मिळाली नाही. याविषयावर ते म्हणाले, घरात अगोदरच खासदार असल्याने एका घरात दोन पदे नको म्हणून राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही, हे माहिती होते व तशी अपेक्षाही नव्हती. मात्र, आता विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे. त्यामुळे त्याची प्रतीक्षा असल्याचे खडसे म्हणाले.