जळगाव - विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडून पराभूत जागांवरील कारणांचा शोध घेतला जात आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेरमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव हा पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे झाल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केल्याने पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत चंद्रकांत पाटील हे नाराज असलेल्या खडसेंची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह परस्परात हाडवैर असलेले माजीमंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. खडसेंकडून स्वकियांवर जोरदार हल्लाबोल सुरू असताना आता ते आजच्या बैठकीत काय तोफगोळे डागतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सिंचन योजनांमध्ये गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात पत्रकार परिषद घेऊन खुलासे केले. यावेळी भाजपतील ओबीसींना डावलण्याचा मुद्दा, पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव अशा मुद्यांवरही महाजन यांनी मौन सोडले. खडसेंच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे जाहीर करत त्यांनी, जर खडसेंना खरंच पाडापाडी करणाऱ्यांची नावे माहिती असतील तर ती त्यांनी जाहीर करावीत, असे आव्हान दिले होते. महाजन यांच्या आव्हानाला खडसे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काय तर प्रत्युत्तर देतात, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.