जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मैं भी चौकीदार- संवाद' या कार्यक्रमाला जळगावात भाजप कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीतील बड्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
'मैं भी चौकीदार संवाद' कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह, भाजपच्या 'या' वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची दांडी - Eknath Khadse
शहरातील बाबा हरदासराम मंगल कार्यालयात या कार्यक्रमाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगची खास व्यवस्था करण्यात आली होती.
शहरातील बाबा हरदासराम मंगल कार्यालयात या कार्यक्रमाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगची खास व्यवस्था करण्यात आली होती. 'मैं भी चौकीदार संवाद' कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केलेले देशहित, देशभक्ती तसेच देश विकासाच्या मुद्दे उपस्थित केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'मैं भी चौकीदार', अशा घोषणा दिल्या. तसेच जोरदार टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे मोदींनी विरोधकांवर केलेल्या टीकेला समर्थन दिले.
बड्या पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाकडे पाठ-
भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. अनुपस्थितामध्ये खासदार रक्षा खडसे, आमदार ए.टी. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, भाजपचे आमदार एकनाथ खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार उन्मेश पाटील आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार तथा विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ या कार्यक्रमाच्या उत्तरार्धावेळी कार्यक्रमाला हजर झाल्या. कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, भाजपचे महापालिका सभागृह नेते ललित कोल्हे, गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, विधानपरिषदेचे माजी आमदार गुरुमुख जगवानी, जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती पोपट भोळे आदींसह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.