जळगाव - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस एकमेकांवर अविश्वास व्यक्त करत होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. यामुळे सुशांतसिंहला न्याय मिळेल अशी आशा आहे, असी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
ते मुक्ताईनगर येथे आपल्या निवासस्थानी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलीस व बिहार पोलीस यांचा एकमेकांवर अविश्वास होता. त्याचबरोबर ते एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप करत होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातील एकमेकांविषयी असलेले अविश्वासाचे वातावरण निवळण्यास मदत होईल, असेही खडसे म्हणाले.