जळगाव -भाजपच्या उभारणीत आमचा खारीचा वाटा आहे. ज्यावेळी पक्षात कोणीही जात नव्हते, पक्षाकडून उमेदवारी घ्यायला तयार होत नव्हते, अशा वेळी आम्ही भाजपकडून उमेदवारी घेतली आणि जागाही निवडूनही आणल्या. व्यक्तिगत पातळीवर निवडूनही आलो. पक्षासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या आहेत. प्रसंगी तुरुंगातही गेलो आहोत. पक्षाने आम्हाला वेळोवेळी तिकिटे दिली; ती आमची निवडून येण्याची क्षमता होती म्हणूनच दिली. पक्षाने आम्हाला खूप दिले हे खरं आहे. पण, आम्हीही पक्षाला काहीतरी दिलेच ना, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर खडसे भाजपवर प्रचंड नाराज आहेत. भाजपला लक्ष करत ते दररोज आपली नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (दि. 13 मे) खडसेंना लक्ष करत पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खडसेंनी देखील तत्काळ चंद्रकांत पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या प्रत्येक मुद्द्यावर खडसेंनी आपली मते मांडली.
खडसे पुढे म्हणाले, मी मागील चाळीस-बेचाळीस वर्षांपासून भाजपसोबत काम करत आहे. पक्ष उभारणीत माझा खारीचा वाटा आहे. मात्र, मला पक्षाकडून नेहमीच सापत्न वागणूक मिळाली आहे. आता विधानपरिषद निवडणुकीसाठी ज्यांचे शून्य योगदान आहे, अशांना तिकिटे देण्यात आली. एवढेच नाही तर ज्यांचे पक्षासाठी काहीही योगदान नाही, अशांना वेळोवेळी मंत्रिपदे देण्यात आली. आमदारकीही बहाल करण्यात आली. आम्ही वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठेने काम केल्यामुळे तिकीटाची मागणी करणे हा आमचा हक्क आहे. त्यामुळे पक्षाने आम्हाला खूप काही दिले असे काय म्हणतात. पक्षासाठी आम्हीही खूप काही केलं आहे ना, असे सांगत खडसेंनी चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला.
आम्हाला तयारी करायला का नाही सांगितले?
विधानपरिषद निवडणुकीसाठी आम्हाला डावलून, ज्यांचे पक्षासाठी काहीही योगदान नाही अशांना संधी देण्यात आली आहे. त्यांची नावे आधीच ठरवण्यात आलेली होती. निवडणुकीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पाहिली तर ही सारी तयारी मार्च महिन्यातच झालेली होती. यासंदर्भात चंद्रकांत पाटलांना पूर्वकल्पनाही होती. त्याशिवाय ही कागदपत्रे कशी तयार झाली? खबरदारी म्हणून कागदपत्रे तेव्हा तयार केली तर त्यावेळी संबंधितांना उमेदवारीची तयारी करायला सांगितली, तर आम्हाला तयारी करायला का सांगितलं नाही, हे सारे पूर्वनियोजितच होते, असा दावाही खडसेंनी केला.
माझ्या घरात भाजपचे एकच पद
माझ्या घरात भाजपची फक्त दोन पदे होती. त्यात एक खासदारकीचे आणि दुसरे आमदारकीचे पद होते. आता फक्त खासदारकी हे एकच पद माझ्या घरात आहे. मी तर आता आमदार देखील नाही. राहिला विषयी महानंदा आणि जिल्हा बँकेच्या पदांचा तर यात आम्ही सहकारातून निवडून आलो आहोत. याठिकाणी भाजपचा दुरान्वये संबंध नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मदतीने आम्ही सहकारात निवडून आलो आहोत. सहकारात कोणत्याही एका पक्षाचे चिन्ह नसते. त्यामुळे मी घरात विविध पदे दिली, असे म्हणणे चुकीचे आहे. उभ्या आयुष्यात भाजपने महानंदचे अध्यक्षपद भूषवले नाही. जळगाव जिल्हा बँकेच्या शंभर वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात भाजपचा अध्यक्ष होऊ शकला नाही. आता महानंदचे अध्यक्षपद रिक्त आहे. माझे भाजपला थेट आव्हान आहे की भाजपने महानंदचे अध्यक्षपद भूषवून दाखवावे. शंभर-शंभर वर्षे भाजप सहकारी संस्थांवर पोहोचू शकला नाही. त्या ठिकाणी आम्ही पोहचलो, ते इतर पक्षांच्या मदतीने. भाजपमुळे नाही, हे चंद्रकांत पाटलांनी लक्षात घ्यावे. सहकारी चळवळीत आम्ही पक्षविरहित निवडून गेलो आहोत, हे देखील त्यांनी ध्यानात घ्यावे, असेही खडसे म्हणाले.
हेही वाचा -खडसेंचा विधानपरिषद निवडणूकीबाबत मोठा गौप्यस्फोट, 'या' पक्षाने दिली होती ऑफर