जळगाव - लोकसभा निवडणुकीवेळी सेनेच्या कार्यकर्त्यांची भाजपवर प्रचंड नाराजी होती. तरीही युतीधर्म पाळण्यासाठी आम्ही पायाला भिंगरी लावून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केल्याचे सेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. परंतु, आता भाजप युती धर्म पाळताना दिसत नसल्याचे ते म्हणाले. भाजपने त्यांच्या बंडोबांना थंडोबा करावे, अन्यथा युतीवर दूरगामी परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील बंडखोरीबद्दल राज्यमंत्र्यांशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी चर्चा केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील सेनेच्या वाट्याला असलेल्या चारही मतदारसंघात भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी सेनेच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार भाजपचे झेंडे हाती घेऊन चिन्हावर उघड प्रचार करत आहेत. यामुळे मतदार तसेच कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. हा प्रकार युतीधर्माच्या विरोधात असून, भाजपने युतीधर्म पाळायला हवा, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
बंडखोरांच्या उमेदवारीवर आमची हरकत नाही. पण जर ते बंडखोर असताना आमच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघात पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार करत असतील तर ही बाब चुकीची असल्याचे मत गुलाबराव पाटील यांना व्यक्त केले आहे. तसेच भाजपने बंडखोरांना आवर घातला पाहिजे, असे ते म्हणाले.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात काय चालले आहे, ते कळत नाही. पैशांच्या जोरावर निवडून येऊ, असे जर बंडखोरांना वाटत असेल तर ते शक्य नसल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आजही माझ्यासोबत भाजपचे काही निष्ठावान कार्यकर्ते असून, गेल्या वेळी मी या मतदारसंघातून 33 हजाराच्या मताधिक्क्याने निवडून आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ५० हजारांचे मताधिक्क्य पार करणआर असल्याचा विश्वास देखील गुलाबरावांनी व्यक्त केला.