जळगाव -'शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ढाल करत महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या सत्तेत आले. परंतु, हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील आहे. केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे होते. पण महाविकास आघाडी सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे,' अशी टीका भाजप खासदार रक्षा खडसेंनी केली आहे.
रक्षा जळगावात असताना पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकार तसेच कृषी मंत्री यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. 'शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचा, शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा राज्याच्या सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने केला होता. पण हा दावा खोटा आहे. शेतकरी संकटात असताना सरकार कोणत्याही प्रकारची उपाययोजना करत नाहीये,' असे त्या पुढे म्हणाल्या.