जळगाव- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. मृत्यूदर देखील आटोक्यात येत नाही. अशा परिस्थितीत नुसत्या आढावा बैठका घेऊन काय उपयोग? राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन याकामी अपयशी ठरले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी यापूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत सूचवलेल्या उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. उपाययोजनाच होत नसल्याने रुग्ण मरतात. मग, आढावा बैठकांमध्ये फक्त कीर्तन करायचे का? अशा शब्दात भाजप आमदारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत आपला संताप व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, भविष्यातील नियोजन यासारख्या विषयांवर चर्चा झाली. स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत भाजप आमदारांनी पालकमंत्र्यांना लक्ष केले. बैठकीच्या सुरुवातीला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १२ व्हेंटिलेटर्स आहेत. मंगळवारपर्यंत अजून ३४ व्हेंटिलेटर्स येणार आहेत. जुलै अखेरपर्यंत पूर्ण ६८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
याच मुद्यावरून माजीमंत्री गिरीश महाजन आणि खासदार उन्मेष पाटील आक्रमक झाले. आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्हेंटिलेटर्स खरेदीच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मग त्यासाठी एवढा वेळ का लागला? अद्याप व्हेंटिलेटर का उपलब्ध झाले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोविडपेक्षाही नॉन कोविड रुग्णांचे मृत्यू जास्त होत आहेत. माणसे मरत आहेत. तरीही प्रशासन हातावर हात धरून का बसले आहे, असा सवाल गिरीश महाजन यांनी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. आमदार मंगेश चव्हाण यांनीही गेल्या बैठकीत काय उपाययोजना करायचे ठरले होते ? त्यावर काय कारवाई केली ? अशी विचारणा करत आढावा बैठकांमध्ये केवळ हरिपाठ व कीर्तन होते. कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. मग बैठकांचा फार्स कशाला? अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
पालकमंत्र्यांनी टोचले आमदार भोळेंचे कान