महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाजनादेश यात्रेत जळगावातील बडे नेते भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता - महाजनादेश यात्रा ७ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यात दाखल

भाजपकडून सुरू असलेल्या मेगा भरतीचे बहुसंख्य प्रवेश हे याच यात्रेत होत आहेत. ७ ऑगस्टला ही यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल होत असून जिल्ह्यातील कोणते नेते भाजपवासी होतील, याची उत्सुकता निर्माण झाली आहे

महाजनादेश यात्रेत जळगावातील बडे नेते भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता

By

Published : Aug 5, 2019, 8:31 PM IST

जळगाव - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ७ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. यावेळी जिल्ह्यातील अनेक बडे नेते भाजप प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपात जाण्यास उत्सुक असल्याचा जाणकारांचा दावा आहे.

मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली २०१४ मध्ये केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था देखील काबीज केल्या. मोदी लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य प्रादेशिक पक्षांची वाताहत झाली. २०१९ मध्ये देखील ही लाट कायम राहिल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. पूर्ण बहुमताने विधानसभा ताब्यात घेण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. याच अनुषंगाने मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे.

जळगावमध्ये ७ ऑगस्टला महाजनादेश यात्रा

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ७ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, माजीमंत्री गुलाबराव देवकर, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, विधानपरिषदेचे माजी आमदार मनीष जैन, काँग्रेसचे रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, अंमळनेरचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी आदींचे भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेला दुजोरा मिळू शकलेला नसला तरी सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ते शक्य असल्याचा जाणकारांचा दावा आहे.

भाजप मारणार 'एका दगडात दोन पक्षी'?

एकीकडे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपवर दबाव आणत आहे तर दुसरीकडे भाजप महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून स्वबळाची चाचपणी करत आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी याठिकाणी सेनेचीही ताकद चांगली आहे. युती झाली नाही तर भाजपला सेनेचेच प्रमुख आव्हान असेल, हे भाजप जाणून आहे. युती फिस्कटली तर भविष्यातील राजकीय डावपेच काय असतील, हे लक्षात घेऊनच भाजप चाल करणार आहे. महाजनादेश यात्रेवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना भाजपात घेऊन त्यांचा सेनेविरोधात प्रमुख आयुध म्हणून वापर करण्याची खेळी भाजप खेळू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details