जळगाव- एकनाथ खडसेच काय तर मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या सात ते आठ नेत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही पक्षाला कोणत्याही प्रकारचा फरक पडला नव्हता. भाजपाकडून मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर ही नेतेमंडळी पक्ष सोडून निघून गेली होती. नंतर पक्षात परत देखील आली होती. भाजपा हा पक्ष व्यक्तीनिर्भर नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर पलटवार केला. यावेळी खासदास व खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या.
भाजपाच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी सायंकाळी बळीराम पेठेतील वसंतस्मृती कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार पलटवार केला. खडसेंनी पक्षांतर केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी घडत आहेत. सध्या खडसे आणि महाजन यांच्यातही शाब्दिक युद्ध रंगले आहे. एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मुक्ताईनगरात गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना 'पुढच्या कालखंडात कोण किती सक्षम आहे, कुणाच्या मागे किती लोक आहेत, हे चित्र दिसेलच', असे वक्तव्य केले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, पक्षाच्या मागे कोण आहे, हे मानणारे आम्ही आहोत. त्यामुळे येत्या कालखंडात ते दिसेलच. हा पक्ष व्यक्तीनिर्भर नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा हा पक्ष आहे. त्यामुळे याठिकाणी लोकं येतील आणि जातील. पण दिवसेंदिवस पक्ष वाढतच चालला आहे. हे आपल्यालाही दिसत आहे. आज लोकसभा तसेच राज्यसभा मिळून 500 पेक्षा अधिक खासदार भाजपाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर, त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण भारतभर भाजपाची घोडदौड वेगाने सुरू आहे. त्यामुळे कोण काय म्हणते? याला फार काही महत्त्व देण्याची गरज नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
2 नोव्हेंबरला जिल्ह्यात भाजपाचे आंदोलन-
कोअर कमिटीच्या बैठकीबाबत माहिती देताना गिरीश महाजन म्हणाले की, सध्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जनसंपर्क अभियान तसेच आत्मनिर्भर भारत असा कार्यक्रम आलेला आहे. याबाबतीत चर्चा करण्यासाठी आजची ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला गिरीश महाजन यांच्या सोबतच प्रांत संघटक विजय पुराणिक, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, मंगेश चव्हाण, माजी आमदार चैनसुख संचेती, स्मिता वाघ, प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर, डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर आदी उपस्थित होते.