जळगाव -राज्य शासनाने केलेल्या चुकांमुळे राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शासनाने योग्य वेळी आवर घातला असता, काही निर्बंध घातले असते तर बरे झाले असते, अशा शब्दांत भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य शासनावर थेट आरोप केला आहे.
राज्य शासनाच्या चुकांमुळे वाढला कोरोनाचा संसर्ग; गिरीश महाजनांचा आरोप
राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शासनाने योग्य वेळी काही निर्बंध घातले असते तर ही वेळ आलीच नसती. परंतु, अजूनही वेळ गेलेली नाही. अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आताही कडक निर्बंध घातले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे.
आज राज्यात सर्वत्र शिवजयंती साजरी होत आहे. गिरीश महाजन आज सकाळी जळगावात शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेले होते. अभिवादन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महाजन यांच्यासोबत आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके आदींची उपस्थिती होती.
अजूनही वेळ गेलेली नाही-
गिरीश महाजन पुढे म्हणाले, राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शासनाने योग्य वेळी काही निर्बंध घातले असते तर ही वेळ आलीच नसती. परंतु, अजूनही वेळ गेलेली नाही. अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आताही कडक निर्बंध घातले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. त्यामुळे जनतेनेही आपली काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
शिवजयंती साजरी करण्यावरच निर्बंध का?
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधांवर गिरीश महाजन यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोरोनाच्या सावटाखाली आज शिवजयंती साजरी होत आहे. एकीकडे राज्य शासनाचे मंत्री, प्रमुख नियमांची पायमल्ली करत आहेत. दररोज मंत्री मोठ्या रॅली काढत आहेत, हजारोंच्या संख्येने मेळावे घेत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. म्हणून मी राज्य शासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. तुम्ही आपल्या लोकांना आवर घालू शकत नाहीत, मग लोकांवर निर्बंध का? कोरोनाचा प्रादुर्भाव आता वाढत आहे. म्हणून सर्वांना नियम लागू झाले पाहिजेत. मात्र, आज आपल्या जाणत्या राजाची जयंती आहे म्हणून आम्ही नियमांच्या चौकटीत उत्सव साजरा करू, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.