जळगाव -राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर बोलायला ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना वेळ नाही, पण आर्यन खानसाठी हेच मंत्रिमंडळ भिडले आहे. ड्रग्ज प्रकरणात जे कायद्याने असेल ते होईल, पण आर्यन खानसाठी अख्ख्या मंत्रिमंडळाचा टाहो का? अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज जळगावात ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आर्यन खानपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, पण त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, हे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा -खासदारालाच अर्ज भरता येत नसेल तर याला काय म्हणावं ? - गुलाबराव पाटील
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात 1 नोव्हेंबर रोजी भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. याची माहिती देण्यासाठी गिरीश महाजन यांनी आपल्या जी.एम. फाउंडेशन कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंदूलाल पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आमदार स्मिता वाघ आदींची उपस्थिती होती. गिरीश महाजन यांनी यावेळी शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, आर्यन खान व समीर वानखेडे प्रकरण, ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिकांचे आरोप, अशा विषयांवर जोरदार टीकास्त्र डागले.
हे तर महाराष्ट्राचे दुर्दैव
ड्रग्ज प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात सर्वसामान्य जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना अख्खे मंत्रिमंडळ एका व्यक्तीला वाचवण्यासाठी ताकद लावत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. एखादा अधिकारी चांगले काम करत असेल तर करू द्या ना. या प्रकरणात जे काही कायद्याने असेल ते होईल. पण, एका माणसाला वाचविण्यासाठी सर्व मंत्रिमंडळ का टाहो फोडत आहे. नवाब मलिक हे मंत्री आहेत. मात्र, असे असताना ते सनदी अधिकाऱ्याच्या बाबतीत चुकीचे आरोप - प्रत्यारोप करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.