जळगाव -राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपले अपयश लपवण्यासाठी कोरोनाची चाचणी असेल, मृतांचा आकडा अशा सर्वच बाबतीत लपवाछपवी चालली आहे. इतका वाईट प्रसंग जनतेवर आला आहे. राज्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. पण, ज्या गांभीर्याने हा प्रसंग घ्यायला हवा, त्या पद्धतीने राज्य शासन गांभीर्याने घेत नाही, अशा शब्दांत भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी टीका करत राज्य शासनाला लक्ष्य केले.
गिरीश महाजन सोमवारी (दि. 26 एप्रिल) दुपारी जळगावात आलेले होते. जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून राज्य शासनावर टीका केली. सोबत आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
शासनाच्या नाकर्तेपणामुळे कोलमडली आरोग्य यंत्रणा
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही शासन हा विषय गांभीर्याने घेत नाही. शासनाच्या अपयशामुळेच आपण ज्यांचा जीव वाचवू शकतो, अशा लोकांचाही मृत्यू होत असल्याचा गंभीर आरोप महाजनांनी केला.
लोकांनी आता करावे तरी काय..?
ग्रामीण भागातील भीषण परिस्थितीकडेही गिरीश महाजन यांनी लक्ष वेधले. राज्यात कोरोनामुळे खूपच वाईट परिस्थिती आहे. विशेष करून ग्रामीण भागातील परिस्थिती विदारक आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा आहे. रुग्णालयांना रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी रेमडेसिवीर व ऑक्सिजन मिळत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. कोरोना चाचणीचे अहवाल 12 ते 14 दिवस येत नाहीत. हे सारे चित्र गंभीर आहे. असे सांगत ते पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात आता तापमान वाढले आहे. अशा स्थितीत ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये विजेचा प्रश्न आहे. रुग्णांसाठी पंखे नाहीत. शासनाने जनरेटर पाठवले, पण ते इन्स्टॉल झालेले नाहीत. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात खूप मोठी आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेऊन अजूनही शासनाने उपाययोजना करायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एकदा चौकशी होऊन जाऊ द्या ना
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे. कोरोनाच्या संकटात मदत करण्याऐवजी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. या विषयावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, विरोधकांच्या म्हणण्याला काहीएक अर्थ नाही. एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकार्याने थेट गृहमंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करावेत, ही घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडली आहे. न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय चौकशी होत आहे. त्यामुळे सत्ताधार्यांच्या म्हणण्याला अर्थ नाही. या प्रकरणात दिलासा मिळावा म्हणून सत्ताधारी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात गेले. पण, त्यांना दिलासा मिळाला नाही. आता एकदा या प्रकरणाची चौकशी होऊन जाऊ द्यावी. भाजप काय म्हणते, याला अर्थ नाही. या प्रकरणाची चौकशी होणे अपरिहार्य आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.
हेही वाचा -जळगावात अत्यवस्थ रुग्णसंख्येचा आलेख चढता; ऑक्सिजनची मागणीही वाढली