महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'भाजपमध्ये कुणीही पाडापाडीचे उद्योग करत नाही, खडसेंचे मताधिक्य आधीच घटले होते' - गिरीश महाजन एकनाथ खडसे

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करून पाडल्याचा एकनाथ खडसेंचा आरोप निरर्थक आहे. त्यांचे मताधिक्य आधीच घटले होते. मागील काही निवडणुकांमध्ये खडसेंचा अगदी कमी मतांनी विजय झाला होता. यावेळी मुक्ताईनगरात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळे रोहिणी खडसेंचा पराभव झाला आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.

girish mahajan
गिरीश महाजन

By

Published : Dec 6, 2019, 8:58 PM IST

जळगाव- भाजपमध्ये कुणीही पाडापाडीचे उद्योग करत नाही. त्यामुळे पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करून पाडल्याचा खडसेंचा आरोप निरर्थक आहे. त्यांचे मताधिक्य आधीच घटले होते. मागील काही निवडणुकांमध्ये खडसेंचा अगदी कमी मतांनी विजय झाला होता. यावेळी मुक्ताईनगरात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळे रोहिणी खडसेंचा पराभव झाला आहे. तरीही खडसेंना वाटत असेल तर त्यांनी पक्षांतर्गत कारवाया करणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, असे थेट आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज खडसेंना दिले.

भाजप नेते गिरीश महाजन

हेही वाचा -पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे म्हणतात...

सिंचन गैरव्यवहाराच्या विषयावर खुलासा करण्यासाठी गिरीश महाजन यांनी आज जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी खडसेंनी पक्षावर केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपत गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता आहे. पराभवामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत. दुसरीकडे, मुलीच्या पराभवामुळे एकनाथ खडसे हे ओबीसींची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घडामोडींसंदर्भात महाजन पुढे म्हणाले, प्रत्येक पक्षात कुठे ना कुठे नाराजी व अस्वस्थता असतेच. अपेक्षित यश न मिळाल्याने ही नाराजी भाजपत असणे स्वाभाविकच आहे. ती लवकरच दूर होईल. पक्षात कुणीही कुणाला पाडण्याचे उद्योग करत नाही. तरीही खडसेंना तशी नावे माहिती असतील तर ती त्यांनी पुराव्यानिशी जाहीर करावीत.

मुक्ताईनगरात मागील काळात एकनाथ खडसे अवघ्या १ हजार २०० मतांनी विजयी झाले होते. तसेच त्याआधी मोदी लाट असतानाही त्यांना ८ हजार ५०० मताधिक्य होते. यंदा तर या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होऊन रोहिणी खडसे यांचा भराभव झाला. कदाचित एकनाथ खडसे स्वतः उमेदवार असते तर ते विजयी झाले असते, असेही महाजन यांनी सांगितले.

कुणीही पक्ष सोडणार नाही-

भाजपमधील अनेक नेते पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याच्या केवळ अफवा व कल्पना आहेत. कुणीही पक्ष सोडणार नाही. भाजप एकसंघ आहे आणि राहील, असा विश्वास देखील गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला. आपण पक्ष सोडणार नाही. आपल्या रक्तात तसे नाही, असे पंकजा मुंडेंनी यापूर्वीच जाहीर केले आहे. भाजप ओबीसी नेतृत्त्व संपवत असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. भाजपने कायम ओबीसींना प्रतिनिधीत्व देण्याची भूमिका ठेवली आहे. सत्तेत असताना अनेक महत्त्वाच्या मंत्रिपदांवर ओबीसी नेतेच असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता १०५ पैकी अनेक आमदार ओबीसी आहेत. आपण स्वतः ओबीसी असल्याचा निर्वाळा त्यांनी केला.

अजित पवारांच्या विषयावर दिली सावध प्रतिक्रिया-

सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांवर तोंडसुख घेणारे गिरीश महाजन आता विरोधी पक्षात असल्याने चांगलेच नरमले आहेत. सिंचन घोटाळ्यात एसीबीने अजित पवारांना क्लीनचीट दिल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता महाजन यांनी सावध उत्तरे दिली. एसीबीने न्यायालयात काय प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, याची आपल्याला माहिती नाही. मला याविषयी काहीएक माहिती नसल्याने बोलणे संयुक्तिक होणार नाही. मात्र, राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या हजारो निविदांची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत केवळ २० टक्के प्रकरणांची चौकशी झाली आहे. अजून ८० ते ८५ टक्के प्रकरणांची चौकशी व्हायची आहे. त्यामुळे पुढे गेल्यावर काय काय होते, ते समोर येईलच, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

ABOUT THE AUTHOR

...view details