जळगाव -एकनाथ खडसे अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा तर नाहीच नाही. मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी पक्षाशी भांडत राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझी नाराजी आहे. 'नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान' या पुस्तकातून मी त्यांचे सर्व कारनामे उघड करणार आहे. जर माझे चुकले असेल तर मला शिक्षा करा, पण माझा गुन्हा काय ते तर सांगा, ही माझी पक्षाला विचारणा आहे, अशी विद्रोही भूमिका मांडत एकनाथ खडसे यांनी बंडाचे संकेत दिले आहेत. दरम्यान, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर उत्तर महाराष्ट्रावर मुख्यमंत्री पदाच्या संधीबाबत या मंडळीने सातत्याने अन्याय केला आहे, अशी खंतही खडसेंनी यावेळी व्यक्त केली.
भुसावळ येथील भाजपचे कार्यकर्ते प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनावर लिहिलेल्या 'जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (दि. 10 सप्टें.) दुपारी मुक्ताईनगर येथे खडसेंच्या फार्महाऊसवर ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना खडसे बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींनी ऑनलाइन पद्धतीने पुस्तकाचे प्रकाशन केले.
या कार्यक्रमाला खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार चैनसुख संचेती, विधानपरिषदेचे माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, फैजपुरचे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज, महंत शास्त्री भक्तीप्रकाशदास आदी उपस्थित होते.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मी आयुष्यात अनेक संकटांवर मात केली हे खरे आहे. पण, जेव्हा-जेव्हा माझ्यावर संकटे आली, त्यातून बाहेर पडण्यासाठी मला कार्यकर्त्यांकडूनच प्रेरणा मिळाली. माझा जीवनप्रवास या पुस्तकातून सुनील नेवेंनी मांडला आहे. प्रकाशनपूर्वीच या पुस्तकाची खूप चर्चा झाली. पण, तुमच्या मनात आहे, ते या पुस्तकात नाहीये. ते दुसरे पुस्तक येऊ घातले आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. मी मंत्री असो किंवा नसो. समाजघटकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे काम मी केले. विरोधी पक्षनेता तसेच मंत्री म्हणून शक्य ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले, असेही खडसेंनी सांगितले.
गोपीनाथ मुंडे राहिले असते तर चित्र वेगळे राहिले असते
गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मला लाभले. सिंचनाच्या क्षेत्रात मला खूप काम करण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांसाठी काहीतरी केले आहे, याचे मला समाधान आहे. सुरुवातीच्या काळात मला भाषणे करणे जमत नव्हते. सुरुवातीच्या अनुभवातून माझा उत्साह वाढत गेला. नंतरच्या काळात मग आठ-आठ तास मी भाषणे केली. भाजपच्या विस्तारात माझे योगदान खूप मोठे आहे, असे आताच नितीन गडकरी, रावसाहेब दानवे म्हणाले. हे सर्व ऐकत असताना मग मला प्रश्न पडला की, पक्ष वाढीसाठी माझे एवढे योगदान असताना मला पक्षाने तिकीट का दिले नाही? मी असे काय केले, मला तिकीट मिळाले नाही. हे शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे. भाजपचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात भाजप म्हणजे शेठजी, भटजी, वाण्यांचा पक्ष अशी ओळख होती. ती आम्ही बदलली. मग माझ्यावर अन्याय का केला. उभा महाराष्ट्र आम्ही पिंजून काढला. प्रतिकूल परिस्थितीत आम्ही सरकार आणले. पण, दुर्दैवाने त्यावेळी मला मुख्यमंत्री होता आले नाही. त्याचे दुःख नाही. पण, नंतरच्या कालखंडात ज्या घटना घडल्या त्यांचे दुःख झाले. आज गोपीनाथ मुंडे असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे राहिले असते. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे नेहमी सत्याच्या बाजूला राहिले. त्यांनी नेहमी दुसऱ्यांना मोठे केले. गोपीनाथ आणि एकनाथ एक आहे, असे म्हणणारा माझा नेता राहिला असता तर आज महाराष्ट्राचे चित्र निश्चितच वेगळे राहिले असते. एकनाथ खडसे अन्याय सहन करणार नाही, स्वस्थ बसणारा नाही. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी पक्षाशी भांडत राहणार आहे, असे खडसे म्हणाले.