जळगाव -विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक होतो. प्रदेश कार्यकारिणीकडून माझ्या नावाची शिफारस देखील करण्यात आली होती. मात्र, पक्षाकडून संधी मिळाली नाही. ज्यांचा पक्षाशी काही संबंध नाही, ज्यांनी पक्षविरोधात काम केले, अशा लोकांना संधी देऊन निष्ठावंतांवर पक्षाने अन्याय केला आहे. सध्या आपण कोरोनाशी लढा देत आहोत, अशा परिस्थितीत राजकीय निर्णय घेणे योग्य होणार नाही. कोरोनाचे संकट टळल्यानंतर भाजपविषयी आपण योग्य निर्णय घेऊ, असा गौप्यस्फोट करत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
'कोरोनाचे संकट जाऊ द्या, त्यानंतर भाजपविषयी योग्य निर्णय घेऊ"
खडसेंनी विधानपरिषदेवर संधी नाकारल्याने आपली पुढील राजकीय भूमिकेसंदर्भात मते मांडली. भाजपकडून सातत्याने अन्याय होत असल्याने खडसे नाराज झाले आहेत. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेसाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. मात्र, ती शिफारस अमान्य करून ज्यांचा पक्षाशी काही संबंध नाही, किंवा ज्यांनी पक्षविरोधी काम केले, अशा लोकांना संधी दिली गेली असल्याचे खडसे म्हणाले.
मुक्ताईनगर येथे आपल्या फार्म हाऊसवर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसेंनी विधानपरिषदेवर संधी नाकारल्याने आपली पुढील राजकीय भूमिकेसंदर्भात मते मांडली. भाजपकडून सातत्याने अन्याय होत असल्याने खडसे नाराज झाले आहेत. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानपरिषदेसाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. मात्र, ती शिफारस अमान्य करून ज्यांचा पक्षाशी काही संबंध नाही, किंवा ज्यांनी पक्षविरोधी काम केले, अशा लोकांना संधी दिली गेली. मला संधी मिळाली नाही, त्यामुळे काहीएक हरकत नाही. परंतु, आजही पक्षात असे अनेक लोक आहेत की जे निष्ठेने पक्षासोबत आहेत. आपल्याला विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, या आशेवर ते काम करत आहेत. माधव भंडारी असतील, केशव उपाध्ये असतील, अवधूत वाघ, नीता केळकर, नांदेडचे कार्यकर्ते मिलिंद पाटील अशा अनेक लोकांची नावे सांगता येतील. ही मंडळी 30 ते 35 वर्षांपासून पक्षासोबत निष्ठेने काम करत आहेत. पक्षाकडून आपल्याला विधानपरिषदेवर संधी मिळेल, अशी त्यांनाही अपेक्षा आहेच, असे खडसे यांनी सांगितले.
पक्षाविषयी निर्णय घेण्याबाबत कार्यकर्त्यांचा दबाव-
काही लोकांना तर चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री यांनी आश्वासनही दिले होते. पुण्याच्या मेघा कुलकर्णी या तर सिटींग आमदार होत्या. हजारो मतांनी निवडून असल्या होत्या. त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागेवर चंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवली. त्यांनाही त्यावेळी विधानपरिषदेचे तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. आज मला पक्षाच्या अशा अनेक कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे फोन येत आहेत. पक्षाकडून सातत्याने अन्याय होत असल्याने काहीतरी निर्णय घ्यावा म्हणून कार्यकर्त्यांचा दबाव आहे. इतर पक्षांकडूनही आमच्याकडे यावं म्हणून मला विचारणा होत आहे. मात्र, सद्यस्थितीत आपण सर्व जण कोरोनासारख्या महाभयंकर महामारीशी लढा देत आहोत. या परिस्थितीत कोणाशी राजकीय चर्चा करणे, राजकारण अशा विषयावर निर्णय घेणे योग्य होणार नाही. कोरोनाचे संकट टळल्यानंतर मात्र, निश्चित जे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, त्याच्याशी चर्चा करून, त्यांचे विचार ऐकून घेत विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेऊ, असे एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.