जळगाव -जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावजवळ घडलेल्या ट्रक अपघातात 15 जणांचा बळी गेला. या घटनेला प्रशासन जबाबदार आहे. अपघातातील जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्या वेळी या ठिकाणी स्थानिक वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते, अशा परिस्थितीत वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव गेला आहे, असा आरोप भुसावळ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते अनिल चौधरी यांनी केला आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेले गरिबांचे बळी किनगावजवळ घडलेल्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात मदतकार्यासाठी दाखल झाले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना चौधरी म्हणाले की, ही घटना स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे. जिल्हाभरात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. किनगावजवळ ज्या ठिकाणी हा अपघात घडला, त्या ठिकाणी धोक्याचे वळण आहे. यासंदर्भात वेळोवेळी वाहनचालकांकडून वळण सरळ करण्याची मागणी होते. परंतु, प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नाही. प्रशासनाला शहाणपण आताही सुचले नाही, असे चौधरी यांनी सांगितले.
जखमी व मृतांना रुग्णालयात आणल्यावर वैद्यकीय अधिकारी गैरहजर-अपघातातील जखमी आणि मृतांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यावेळी, वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात उपस्थित नव्हते. अशा परिस्थितीत अनेकांना उपचार न मिळाल्याने त्यांचा जीव गेला असावा, त्यातील काही जखमींना तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले .वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचा आरोप यावेळी यांनी चौधरी यांनी केला.
स्थानिक लोकप्रतिनिधींची बेफिकिरी-तालुक्यात एवढी भीषण घटना घडून देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी बेफिकिरी दाखवली. त्यामुळे अनिल चौधरी यांनी संताप व्यक्त केला. स्थानिक आमदारांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी अनिल चौधरी व निळे निशाण संघटनेचे आनंद बाविस्कर यांनी केली.