मुंबई - नुकतीच भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. मात्र, या चौथ्या यादीतही पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव आले नाही. तर त्यांच्या ऐवजी खडसेंच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसेंच्या कन्या रोहिणी-खडसे खेवलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे राज्यातील पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारून त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे खडसेंच्या एका डोळ्यात 'हसू' आणि एका डोळ्यात 'अश्रू' अशी काहीशी परिस्थिती खडसेंची निर्माण झाली आहे. एकप्रकारे 'खडसेंना डच्चू...खडसें'नाच उमेदवारी अशी स्थिती मतदारसंघात झाली आहे.
खडसेंचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र तावडे, मेहता आणि पुरोहीत यांना उमेदवारी नाकरल्याची उलटसुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी तिकीट वाटपात आपली मुत्सद्दीगिरी दाखवून देत सर्वांनाच सुचक इशारा दिला आहे.याचा अर्थ असा की खडसेंना डच्चू...तर खडसेंना उमेदवारी असे दिसून येत आहे.
हेही वाचा - ..या कारणांमुळेच खडसे, तावडे, मेहता, पुरोहीत यांचा पत्ता झाला कट ?
भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आदींची नावे त्या यादीत आलीत. मात्र, पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव पहिल्या यादीत न आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पहिल्या यादीची अपेक्षा मावळल्यावर दुसरी यादीत 14, तिसऱ्या यादीत 4 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, यामध्ये देखील खडसेंचे नाव न आल्याने जळगाव जिल्ह्यासह राज्यांतील अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी तर आता खडसे पक्षांतर करणार की काय असा अंदाजही लावायला सुरूवात केली. तिकडे मुंबईत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर रित्या सांगितले की, खडसे गेल्या 3 महिन्यांपासून संपर्कात आहेत. एवढेच नव्हे तर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे खडसेंच्या भेटीला जळगावकडे रवाना झाले आहेत, यांसारख्या ब्रेकिंग सुद्धा माध्यमांवर दाखवल्या जाऊ लागल्या. मात्र, सगळीकडे या वावड्य़ा उठल्यानंतर देखील खडसेंनी शेवटपर्यंत म्हणजे गुरूवारी देखील पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी काहीही झाले तरी पक्षाचा निर्णय मला मान्य राहील आणि शेवटपर्यंत मी भारतीय जनता पक्षातच राहील.
यानंतर आज (शुक्रवारी) भारतीय जनता पक्षाची यादी जाहीर झाली आणि या यादीत खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना पक्षाने खडसेंच्या जागी उमेदवारी दिली. आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे खडसेंना डावलून त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन पक्षाने त्यांची बोळवण तर केली नाही ना ? तसेच गेल्या 5 वर्षात असे अचानक काय झाले की, मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक, 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणूकींमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती, आणि त्यानंतर तब्बल 11 पेक्षा जास्त मंत्रालये साभाळणाऱ्या व्यक्तीला 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये साधी उमेदवारी देखील मिळू नये ? तर हे काही आकस्मित घडले असे वाटत नाही.
हेही वाचा -पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन