जळगाव - शेतकऱ्यांशी निगडित विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दुपारी जामनेर शहरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवले नाहीत तर भाजपकडून यापुढे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिलाय.
शेतकऱ्यांशी निगडित विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दुपारी जामनेर शहरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे पीककर्ज त्वरित मिळावे, कापूस, मका तसेच हरभऱ्याची हमीभावात खरेदी झालीच पाहिजे, कृषी कर्जमाफीची अंमलबजावणी तातडीने करावी, अशा अनेक मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने आंदोलन केले.
माजीमंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित आंदोलनाचे नेतृत्त्व केले. आंदोलनापूर्वी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर माजीमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांसमोर भाजपची भूमिका मांडली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे राज्याचा कारभार सांभाळण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असे महाजन म्हणाले.
यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचा कापूस, मका तसेच हरभऱ्याची हमीभावात खरेदी झालेली नाही. शेतकऱ्यांना खरिपचे पीककर्ज मिळालेले नाही. कर्जमाफी योजनेची अजूनही प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही. शेतकऱ्यांशी निगडित प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.
आंदोलकांकडून जमावबंदीचे उल्लंघन
आंदोलनावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आहे. मात्र भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचे सर्रास उल्लंघन केले. आंदोलन करताना फिजिकल डिस्टन्सिंगला देखील हरताळ फासण्यात आला.