जळगाव- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आज (सोमवारी) झालेल्या विषय समिती सभापती निवडीत देखील भाजपचेच वर्चस्व पाहायला मिळाले. चारही विषय समिती सभापती पदांवर भाजपचे सदस्य विराजमान झाले.
विषय समिती सभापती निवडीत भाजपचे वर्चस्व हेही वाचा-'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!
भाजपचे सदस्य जयपाल बोदडे यांची समाजकल्याण, रवींद्र पाटील यांची आरोग्य, ज्योती पाटील यांची महिला व बालकल्याण तर उज्ज्वला म्हाळके यांची शिक्षण समिती सभापतीपदी वर्णी लागली आहे. या निवडणुकीत भाजपसोबत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्यावतीने देखील उमेदवार उभे केल्याने चुरस निर्माण झाली होती. परंतु, प्रत्यक्ष मतदानावेळी भाजपच्या बाजूने 35 तर महाविकास आघाडीच्या बाजूने अवघी 29 मते पडली. त्यामुळे चारही जागी भाजपचे उमेदवार निवडून आले. अर्ज दाखल करतेवेळी भाजपतील गटबाजीचे दर्शन झाले होते. सभापतीपदाचा शब्द देऊनही ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी दुसऱ्याच सदस्यांचे अर्ज दाखल केल्याने भाजपच्या दोघा सदस्यांनी आक्रमक होत बंडखोरी केली होती. त्यामुळे प्रथमदर्शनी सोपी वाटणारी निवड भाजपसाठी तापदायक ठरणार असल्याचे पाहायला मिळाले होते.
मात्र, भाजपच्या नेत्यांनी आपले राजकीय डावपेच वापरत मध्यमार्ग काढला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील, सेनेचे पवन सोनवणे व कल्पना पाटील तर काँग्रेसच्या सुरेखा पाटील यांनी अर्ज भरले होते. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे. दोघांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.