जळगाव- लॉकडाऊनच्या काळात सर्व नियम धाब्यावर बसवून जळगावातील एका भाजप नगरसेवकाने पोलीस कर्मचारी तसेच काही वाळुमाफियांसोबत शेतात ओली पार्टी केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मद्याचे 'पॅक' रिचवत असताना या सर्वांनी 'रमी'चा डावही मांडला होता. या प्रकाराची कुणकुण लागताच पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. या चौकशीचा अहवाल सोमवारी पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आला असून, अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
लॉकडाऊनच्या काळात असलेली मद्यविक्री बंदी, जमावबंदी तसेच सोशल डिस्टन्सिंग हे सर्व नियम झुगारून शहरातील भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील, पोलीस कर्मचारी विनोद चौधरी याच्यासह 7 वाळुमाफियांनी 21 एप्रिलला शहरालगत मोहाडी शिवारातील एका शेतात ओली पार्टी केली होती. शेतात मद्य रिचवत जुगार खेळत असलेल्या या नवाबी पार्टीचे काही फोटो 23 एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही बाब प्रसारमाध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. त्यांनी तत्काळ या प्रकरणाच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.