जळगाव -पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आज (शनिवारी) भाजपच्या वतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जळगावात देखील भाजपकडून आंदोलनाची तयारी करण्यात आली होती. परंतु, पोलीस प्रशासनाने भाजपचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच बळाचा वापर करून उधळून लावले. आंदोलनासाठी जमलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यामुळे भाजपचे आंदोलन होऊ शकले नाही.
काय आहे प्रकरण?
बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली आहे. या कथित प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय चव्हाण यांचे नाव विरोधकांकडून घेतले जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर सुरुवातीच्या काळात मंत्री संजय राठोड हे काही दिवस नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते सर्वांसमोर आले. परंतु, त्यांनी या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत मौन बाळगले. राज्य शासनाने देखील या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे पावले उचलली नाही, मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. मंत्री राठोड यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, पूजाला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.