जळगाव - जिल्हा परिषदेत सत्ता टिकविण्यात भाजपला यश आले आहे. अध्यक्षपदी ऐनपूर-खिरवड गटाच्या सदस्या रंजना प्रल्हाद पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नशिराबाद भादली गटाचे सदस्य लालचंद पाटील यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला याठिकाणी सपशेल अपयशी ठरला. विशेष म्हणजे, भाजपने गेल्या वेळप्रमाणे काँग्रेसला सोबत घेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता मिळवण्याचे मनसुबे उधळून लावले.
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली. दोन्ही पदांसाठी भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपकडून अध्यक्षपदासाठी ऐनपूर-खिरवड गटाच्या रंजना प्रल्हाद पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना सूचक म्हणून नंदा पाटील आणि जयपाल बोदडे होते. तर उपाध्यक्षपदासाठी लालचंद पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचे सूचक म्हणून अनिल देशमुख आणि मधु काटे होते. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्षपदासाठी लोहारा-कुऱ्हाड गटाच्या सदस्या रेखा दिपकसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना सूचक म्हणून नानाभाऊ महाजन आणि मनोहर पाटील होते. तर उपाध्यक्षपदासाठी अमळनेर तालुक्यातील कळमसरे-जळोद गटाच्या सदस्या जयश्री पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून नीलम पाटील आणि स्नेहा गायकवाड होत्या.