जळगाव- राज्यातील शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ढाल करत सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. कर्जमाफीचा तिढा सुरूच आहे. शेतीला पुरेसा वीजपुरवठा होऊ शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर भाजपच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
हेही वाचा -अंडरवर्ल्डमधील मांडवली बादशहा सलीम महाराजला अटक
गिरीश महाजन सोमवारी सायंकाळी जळगावात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू, असे या सरकारने जाहीर केले होते. मात्र, आज शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसेही या सरकारने शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आम्ही 25 हजार रुपये हेक्टरी भरपाई देवू, असे सरकारने जाहीर केले होते. पण आजपर्यंत एक दमडीही शेतकऱ्यांच्या हातात पडलेली नाही. शेतकरी कर्जमाफी ताबडतोब करू, असे सांगितले. परंतु, अद्यापही ही कर्जमाफी झालेली नाही. तांत्रिक मुद्यातच ती अडकलेली आहे, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली.