जळगाव - पावसाळ्याला सुरुवात झाली, तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांचा कापूस, मका, हरभरा राज्य सरकारने खरेदी केलेला नाही. खरीप हंगामाच्या पेरणीची वेळ असताना शेतमाल विक्री न झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. सरकारच्या उदासीन धोरणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप करत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात शनिवारी भाजपकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर फेकून राज्य सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. दरम्यान, येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल खरेदी झाला नाही; तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शेतमाल खाली करू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
चाळीसगाव शहरातील सिग्नल चौकात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस व मका येत्या 15 दिवसात खरेदी करण्यात यावा, शेतकी संघात मका खरेदीसाठी करण्यात आलेल्या नोंदणीत टोकन न देता खऱ्या शेतकऱ्यांना डावलण्यात आले असून त्याची सखोल चौकशी करावी, यासह शेतकऱ्यांशी निगडित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भाजपकडून हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा...चीनची आर्थिक नाकाबंदी; अर्थ मंत्रालयाने तयार केला 'हा' प्रस्ताव