जळगाव- विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेत युती फिस्कटण्याची चिन्हे दिसत असल्याने जळगावात भाजपने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. भाजपने सोमवारी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नाकेबंदीसाठी सेनेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील भाजप आणि सेनेतील वाद पुन्हा एकदा समोर आले आहे.
जळगावात भाजपकडून स्वबळाची तयारी
२०१४ पूर्वी भाजप आणि सेना युतीमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा सेनेच्या वाट्याला देण्यात आली होती. परंतु, २०१४ मध्ये ऐनवेळी युती फिस्कटल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पुन्हा दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून एकत्र आले. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा युती तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही शक्यता गृहीत धरून भाजपने जळगावात स्वबळाची तयारी सुरू केली आहे. आज (सोमवार) भाजपने सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला. विशेष म्हणजे, गुलाबरावांच्या नाकेबंदीचे संकेत देण्यासाठी भाजपने त्यांच्या पाळधी गावातच हा मेळावा घेतला.
हेही वाचा - जळगावात 34 लाख 47 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
जळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजपकडून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील तसेच चंद्रशेखर अत्तरदे हे तिघे इच्छुक आहेत. त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात तयारी देखील सुरू केली आहे. गुलाबराव पाटील यांनी आपल्या ५ वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मतदारसंघाचा नव्हे तर स्वतःचा विकास साधला. भूलथापा देऊन त्यांनी मतदारसंघातील जनतेची दिशाभूल केली. आता त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा निर्धार यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
हेही वाचा - 'सर्वात जाड कातडी असलेला प्राणी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी'
दरम्यान, भाजपच्या मेळाव्याची कुणकुण लागताच रविवारी रात्री काही लोकांनी मेळाव्याच्या ठिकाणी जाऊन खुर्च्या, जेवणाची भांडी तसेच वाहनांची तोडफोड केली. ही तोडफोड गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप मेळाव्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या प्रकारासंदर्भात गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. मला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेला डाव आहे. मी खालच्या स्तराचे राजकारण करत नाही. भाजप आणि सेनेत युती होणार आहे. त्यामुळे भाजपने घेतलेला मेळावा मला फायद्याचा ठरू शकतो. त्यांच्या मेळाव्याला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.