जळगाव- राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर जल्लोष करताना भाजपच्या एका अतिउत्साही पदाधिकाऱ्याने पिस्तूलातून हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात घडला होता. कांतीलाल चंपालाल जैन असे त्या उत्साही पदाधिकाऱ्याचे नाव असून तो भाजपच्या व्यापारी आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसांनी जैन याला अटक करून समज देत त्याची सुटका केली.
जळगावात जल्लोष करताना भाजप पदाधिकाऱयाचा हवेत गोळीबार हेही वाचा -भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. यावेळी भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल चंपालाल जैन याने आपल्या पिस्तूलातून हवेत तीन फायर केले होते. या घटनेनंतर त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिस्तूल जप्त केली होती. पोलिसांनी जैन याला समज देऊन त्याची सुटका केली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा प्रकार घडल्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 'पार्टी विथ डिफरन्स' असे बिरुद मिरवणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करताना सामाजिक भान जपायला हवे, अशीही टीका यानिमित्ताने होत आहे.