महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भुसावळ विधानसभा मतदारसंघ : राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. भुसावळ विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष तिरंगी लढत होत असून विद्यमान आमदार संजय सावकारे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

By

Published : Oct 11, 2019, 8:32 PM IST

Updated : Oct 12, 2019, 5:25 PM IST

भुसावळ विधानसभा मतदारसंघ

जळगाव -रेल्वेचे माहेरघर म्हणून परिचित असलेला भुसावळ विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या देखील तितकाच संवेदनशील आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळात जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी भुसावळ मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे. तसेच विद्यमान आमदार संजय सावकारे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पहायला मिळत आहे.

भुसावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे संजय सावकारे आणि मधु मानवतकर यांच्यात सरळ लढत

रेल्वेचे जंक्शन असल्याने भुसावळ तालुका जळगाव जिल्ह्यातील प्रभावी तालुका मानला जातो. सन २००९ मध्ये मतदार फेररचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला. यावर्षी भुसावळ मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार संजय सावकारे रिंगणात आहेत, तर त्यांच्यासमोर आघाडीकडून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महामंत्री जगन सोनवणे नशीब आजमावत आहेत. दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मधु मानवतकर यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम केल्याने निवडणूकीची रंगत वाढली आहे.

हेही वाचा... आमच्याकडे भागवत सप्ताह चालण्या इतपत विकासाचे मुद्दे; अमित शाहांचे पवारांना प्रत्युत्तर

भाजपचे संजय सावकारे आणि आघाडीचे जगन सोनवणे या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या अडचणी वाढविण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांनी अपक्ष उमेदवाराची खेळी केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या मनासारखा उमेदवार न दिल्याने संतोष चौधरींनी डॉ. मधु मानवतकर यांना पाठींबा देऊन धक्कातंत्र अवलंबले आहे. भुसावळ शहरासह तालुक्यात चौधरींना मानणारा वर्ग मोठा असल्याने संजय सावकारेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
एकेकाळी चौधरींचे स्वीय सहायक असलेले संजय सावकारे हे चौधरी यांना शह देऊन पुढे गेले. या बाबीचे शल्य चौधरींच्या मनात कायम आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी चौधरींनी कंबर कसली आहे. त्यामुळे डॉ. मानवतकर या रिंगणातील उमेदवार असल्या तरी पडद्यामागची खरी लढत संतोष चौधरी विरुद्ध संजय सावकारे अशीच आहे. आता यात चौधरी बाजी मारतात की सावकारे विजयाची हॅट्रिक साधतात, याचीच उत्सुकता आहे.

हेही वाचा... भाजपच्या उमेदवाराला संतप्त ग्रामस्थांनी विचारला जाब, नंतर घडले असे काही...

२००९ मध्ये तत्कालीन आमदार संतोष चौधरी यांचे स्वीय्य सहायक असलेले संजय सावकारे हे राष्ट्रवादीकडून निवडून आले. हा मोठा अनपेक्षित बदल भुसावळ मतदारसंघाने अनुभवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले संजय सावकारे यांना पहिल्याच टर्ममध्ये जळगावच्या पालकमंत्री पदाची लॉटरी लागली होती. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय सावकारे यांनी पुढे २०१४ मध्ये भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. त्यावेळी एकनाथ खडसेंच्या मदतीने सावकारे यांनी पुन्हा ही जागा जिंकली होती. आता ते भाजपकडून पुन्हा रिंगणात आहेत. भुसावळ तालुक्यातील ९० टक्के भाग ड्रायझोन असून बागायती तसेच सिंचनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. एमआयडीसीचा खुंटलेला विकास, भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळण्याचा प्रलंबित प्रश्न, रोजगार, वाढती गुन्हेगारी, पायाभूत सुविधा, अशा मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत गेल्या पाच वर्षात केलेली काही विकासकामे तसेच भाजपच्या ताकदीच्या बळावर आपण विजयाची हॅट्रिक साधू, असा विश्वास संजय सावकारेंना आहे.

हेही वाचा... .... आता पोत्यात पैसे नेले तर खिशात सामान येते - छगन भुजबळ

भुसावळ हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने माजी आमदार संतोष चौधरी थेट रिंगणात उतरू शकत नाहीत. त्यामुळे कट्टर विरोधक असलेल्या संजय सावकारेंना शह देण्यासाठी त्यांनी डॉ. मानवतकरांना पाठींबा देऊन राजकीय खेळी केली आहे. चौधरींच्या या खेळीमुळे सावकारेंच्या अडचणी तर वाढल्या आहेतच शिवाय भुसावळातील राजकीय द्वंदातील रंगत देखील वाढली आहे. आता या लढाईत चौधरी बाजी मारतात की सावकारे पुन्हा आमदार होतात, याकडे लक्ष लागले आहे.

Last Updated : Oct 12, 2019, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details