जळगाव -जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. सर्वच क्षेत्रावर कोरोनामुळे विपरीत परिणाम झाला आहे. असे असताना सट्टा बाजार मात्र कोरोनामुळे तग धरून उभा आहे. दरवर्षी मार्च ते जून महिन्यादरम्यान आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जातो. परंतु, यावर्षी कोरोनामुळे सर्वच क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या, निवडणुकांचाही मोसम नाही. अशा परिस्थितीत सट्टा बाजार चालवणाऱ्यांनी नवा 'फंडा' शोधून काढला आहे. सध्या दररोज समोर येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीवर सट्टा खेळला जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील या माध्यमातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. बुकींनी खासगी चर्चेमध्ये हा गौप्यस्फोट केला आहे.
कोरोनाच्या वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येवर सट्टा खेळला जात आहे. देश, राज्य, जिल्हा, शहर व तालुकास्तरावरील पॉझिटिव्ह रुग्णांच्या एकूण संख्येवर सट्टा लावला जात आहे. जग ज्या समस्येशी लढा देत आहे, त्याच समस्येला संधी मानून सट्टा बाजारातील तज्ज्ञ बुकींनी आर्थिक फायद्याचे गणित शोधून काढले आहे. सट्टा म्हणजे आकडेवारीचा खेळ आहे. एरवी क्रिकेट स्पर्धा, निवडणुकांच्या काळात सट्टा बाजार गरम असतो. मात्र, टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या, तर देशभरात निवडणुकाही नाहीत.
दरवर्षी, एप्रिल ते जून हे तीन महिने सट्टा बाजारातील सर्व बुकी आयपीएल स्पर्धेवर लागणाऱ्या सट्टा प्रक्रियेत गुंतलेले असतात. मात्र, आयपीएल स्पर्धा रद्द झाल्याने सट्टा बाजारातील बुकींनी कोरोना रुग्णांच्या वाढत जाणाऱ्या संख्येवर सट्टा घेणे सुरू केले आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशा परिस्थितीत काही मोबाईल अॅप, शासकीय आकडेवारी, प्रसारमाध्यमांद्वारे मिळत असलेल्या आकडेवारीवर बुकींच्या नजरा असतात. त्याच आधारावर सट्टा बाजार तेजीत सुरू आहे.
असा ठरतोय भाव -