जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढतच चालला आहे. जळगाव जिल्ह्यात दररोज शेकडोंच्या संख्येने नविन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. कधी कधी तर पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा आकडा हजाराचा टप्पा ओलांडतो आहे. त्यामुळे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक राहत नाही. परिणामी, पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयांमध्ये नव्याने दाखल होण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना बेड मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. म्हणून बेडच्या समस्येमुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना 'होम आयसोलेट' करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग काही केल्या कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान कायम आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 43 हजार 897 इतकी झाली आहे. त्यातील 32 हजार 941 रुग्ण कोरोनातून बरे झाले असले तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत 9 हजार 860 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांमध्येही 669 रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. तर 287 अत्यवस्थ रुग्णांवर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्येची अशी परिस्थिती असताना बेड्स उपलब्धतेचा विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर्समध्ये अवघे 12 हजार 854 बेड्स उपलब्ध आहेत. त्यात 263 बेड्स हे अतिदक्षता विभागाचे आणि 1 हजार 643 बेड्स हे ऑक्सिजनची व्यवस्था असणारे आहेत. यातही दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शेकडोने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचा रुग्णांबाबतचा अंदाज चुकत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता कोविड हॉस्पिटलसह कोविड केअर सेंटरमध्ये बेड्सचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण बेड्सअभावी तासनतास ताटकळत बसत आहेत. ही धक्कादायक परिस्थिती हाताळताना आरोग्य यंत्रणेची कसोटी लागत आहे.
प्रशासनाची लागतेय कसोटी -
जिल्ह्यात सद्यस्थितीत असलेल्या 9 हजार 860 अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 4 हजार 890 रुग्ण हे कोविड केअर सेंटरमध्ये, 807 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर 669 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दररोज वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची उपाययोजना करताना चांगलीच कसोटी लागत आहे. बेड्स आणि इतर बाबींचा तुटवडा लक्षात घेता प्रशासनाकडून आता सौम्य लक्षणे असणाऱ्या तसेच पॉझिटिव्ह येऊनही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना 'होम आयसोलेट' होण्याबाबत आवाहन केले जात आहे.