महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा फटका; जळगावात केळीचे दर क्विंटलमागे 600 रुपयांनी घसरले! - जळगावात केळीचे दर लॉकडाऊमुळे कमी

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी कडक निर्बंध सुरू असल्याने व्यापार, उद्योग तसेच बाजारपेठेवर काही निर्बंध घालण्यात आले आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत मागणी घटल्याने जळगाव जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत केळीचे दर कोसळले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी दीड हजार रुपये प्रतिक्विंटलच्या घरात असलेले दर आजच्या घडीला 700 ते 800 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत.

जळगाव
जळगाव

By

Published : Apr 27, 2021, 9:34 PM IST

जळगाव- कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. कृषी क्षेत्रही त्याला अपवाद नाही. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी कडक निर्बंध सुरू असल्याने व्यापार, उद्योग तसेच बाजारपेठेवर काही निर्बंध घालण्यात आले आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत मागणी घटल्याने जळगाव जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत केळीचे दर कोसळले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी दीड हजार रुपये प्रतिक्विंटलच्या घरात असलेले दर आजच्या घडीला 700 ते 800 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जळगाव

आता निर्यातक्षम केळी काढणीचा हंगाम आहे. परंतु, कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतमाल वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यात हजारो क्विंटल केळी कापणीविना शेतातच पडून आहे. तसेच कापणी झालेली केळी व्यापारी कवडीमोल भावात खरेदी करत आहेत. केळी हा नाशवंत माल असल्याने शेतकरी नाईलाजाने केळी विकत आहेत. सध्या केळीला 700 ते 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हाच दर या हंगामात 1200 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल असतो. मात्र, कोरोनाच्या नावाखाली व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत.

केळी उत्पादक शेतकरी हवालदिल-

केळी उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या खर्च पाहता केळीला योग्य दर दिला पाहिजे, अशी केळी उत्पादकांची मागणी आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने केळीच्या वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. 4 ते 5 लोकांपेक्षा जास्त जण एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे केळीची कापणी आणि वाहनांमध्ये लोडिंग कशी करावी, हा प्रश्न शेतकरी तसेच व्यापाऱ्यांसमोर आहे. सध्या केळीला मिळणारा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. केळीला किमान 1200 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला पाहिजे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

निर्यातीवर झाला आहे परिणाम-

जळगाव जिल्ह्यातील केळी निर्यातक्षम असते. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत तिला मोठी मागणी असते. इक्वाडोर, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, मोझाम्बिक, पनामा, मलेशिया इंडोनेशिया, कोलंबिया यासह आखाती देशांमध्ये जिल्ह्यातील केळी मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. मात्र, कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीवर परिणाम झाल्याने केळी पडून आहे. दुसरीकडे, देशांतर्गत बाजारपेठेतही अशीच काहीशी स्थिती आहे. जिल्ह्यातून उत्तर भारतातील दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये थेट केळीचा माल जातो. परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तेथील स्थानिक व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतला आहे. शिवाय स्थानिक बाजारपेठ बंद असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी विक्री थांबवली आहे. म्हणून केळीचा माल पडून आहे. अशा परिस्थितीत स्थानिक बाजारपेठेत केळीचे दर प्रतिक्विंटल मागे 500 ते 600 रुपयांनी खाली आले आहेत.

सणासुदीत आर्थिक फटका-

देशांतर्गत केळीचे उत्पादन घेतले जाणाऱ्या आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील नांदेड, सोलापूर या भागातील केळीची काढणी अपेक्षेपेक्षा लवकर संपली आहे. त्यामुळे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात केळी शिल्लक आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील बडवानी व बऱ्हाणपूर या जिल्ह्यांमध्येही काही केळी उरली आहे. व्यापाऱ्यांकडून मागणी घटल्याने केळीला उचल नाही. अशा परिस्थितीत केळी उत्पादक शेतकरी चिंतीत आहेत. केळी नाशवंत असल्याने शेतातील माल शेतकरी मिळेल त्या दरात विकून मोकळे होत आहेत. सध्या पवित्र रमजान आणि चैत्र नवरात्रोत्सव आहे. दरवर्षी काळात केळीला चांगला दर असतो. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून केळी उत्पादकांना फटका बसला आहे.

काय म्हणतात व्यापारी आणि शेतकरी-

आम्ही रोज 500 क्विंटल केळी विक्री करत होतो. पण सध्या दिल्लीत लॉकडाऊन असल्याने 100 क्विंटल केळीही विकली जात नाही. केळी विक्रीसाठी हातगाडी लावणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांनी हातगाड्या लावल्या तर प्रशासन विरोध करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मालाला उठाव नाही. आधीच 1500 रुपये क्विंटलने खरेदी केलेली केळी गोदामात भरुन आहे. त्यामुळे केळीची नवीन खरेदी थांबवली आहे. केळीला रस्त्यावर ग्राहक नसल्याने उठाव नाही म्हणून केळीचे दर पडले आहेत, अशी माहिती केळीचे व्यापारी आर. के. ताराचंद यांनी दिली. दरम्यान, गेल्या आठवडाभरात केळीच्या दरात 500 ते 600 रुपयांनी घसरण झाली आहे. ऐन काढणीच्या वेळी दर कोसळतात. त्यामुळे केळी उत्पादकाने करायचे काय? असा प्रश्न केळी उत्पादक शेतकरी कमलाकर पाटील यांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details