महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उत्तर भारतातील हिमवृष्टीचा केळीला फटका; आठवडाभरात दर घसरले

उत्तर भारतात सध्या जोरदार हिमवृष्टी होत आहे. हिमवृष्टीमुळे दिल्लीहून पुढे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जाणारे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून उत्तरेकडील राज्यांमध्ये केळी निर्यात करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय उत्तरेत केळीला मागणी देखील कमी झाली आहे. या कारणांमुळे केळीचे दर झपाट्याने घसरले आहेत.

By

Published : Dec 21, 2019, 8:06 PM IST

Banana rate decreased in Jalgaon district
उत्तर भारतातील हिमवृष्टीचा केळीला फटका

जळगाव - हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तरेतील राज्यांकडून केळीची मागणी कमी झाल्याने जिल्ह्यातील केळीचे दर घसरले आहेत. आठवडाभरात केळीचे दर प्रतिक्विंटल मागे 150 ते 200 रुपयांनी घसरले आहेत. याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान, स्थानिक बाजारपेठेत केळीला मागणी कायम असताना व्यापाऱ्यांनी मात्र, लॉबिंग करत केळीचे दर पाडले आहेत, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

जळगावात केळीचे दर घसरले

उत्तर भारतात सध्या जोरदार हिमवृष्टी होत आहे. हिमवृष्टीमुळे दिल्लीहून पुढे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जाणारे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून उत्तरेकडील राज्यांमध्ये केळी निर्यात करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय उत्तरेत केळीला मागणी देखील कमी झाली आहे. या कारणांमुळे केळीचे दर झपाट्याने घसरले आहेत. आठवडाभरातच केळीचे दर प्रतिक्विंटल मागे 150 ते 200 रुपयांनी घसरले आहेत. मागील आठवड्यात जिल्ह्यातील 'केळीचा हब' म्हणून लौकिक असलेल्या रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीने केळीला 1400 रुपये प्रतिक्विंटल आणि फरक 12 रुपये असा एकूण 1484 रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला होता. मात्र, आठवडाभरातच केळीचे दर खाली आले आहेत. सध्या केळीला 1200 ते 1250 रुपये प्रतिक्विंटल आणि फरक 10 ते 12 रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा -शेतकरी कर्जमाफीची घोषणा लांबणीवर? जाणून घ्या 'काय' म्हणाले नवाब मलिक...

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार समितीच्या लिलावात केळीचे दर प्रथमच रावेरच्या केळी दरापेक्षा कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत उत्कृष्ट दर्जाच्या केळीला 850 ते 900 रुपये प्रतिक्विंटल दर गेल्या 3 ते 4 दिवसांपूर्वी मिळाला. पुढे सलग 2 दिवस हेच दर कायम होते. केळीची आवक कमी असताना येथे केळीचे दर वाढलेले नाहीत. बऱ्हाणपूर पट्ट्यातील केळीपेक्षा जिल्ह्यातील केळीचा दर्जा उत्तम आहे. मात्र, असे असताना जळगावच्या स्थानिक बाजारपेठेत केळीला उच्चतम दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दर पाडण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा -विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस; शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

सध्या जळगावसह शेजारील धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातून केळीला मागणी कायम आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने केळीला चांगला दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र, व्यापारी बाजारात लिलावावेळी केळीला कमी बोली लावतात. केळी हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने तो विकावाच लागतो, अशी प्रतिक्रिया शेतकरी केळीच्या दराविषयी देत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details