जळगाव - पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत २०१९-२० मध्ये जिल्ह्यातील ४२ हजार १७९ शेतकऱ्यांनी एकूण ३५ कोटी ७२ हजारांचा विमाहप्ता भरला होता. अॅग्रीकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया या विमा कंपनीमार्फत हा विमा भरण्यात आला होता. त्यापैकी ४१ हजार ३७९ शेतकऱ्यांना ५४ हजार १२४ हेक्टर क्षेत्रासाठी २८७ कोटी ५९ लाख रुपयांची विमा संरक्षित रक्कम मंजूर झाली आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खरीप हंगाम, चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर विमा कंपनी व कृषी विभागाच्या बैठका घेतल्या होत्या. आता शेतकऱ्यांना फळपीक विमा मंजूर झाला आहे. गेल्या काही वर्षापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक व कृत्रिम आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी शासनाकडून फळ पीकविमा काढून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळत असते. यंदा जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे केळीची मागणी घटली होती. भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना अर्ध्यापेक्षा कमी दराने केळीविक्री करावी लागली. त्यामुळे पीक विम्याची रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र, राज्य शासनाने त्यांच्या भागात आलेली रक्कम भरण्यास दोन महिने उशीर केल्यामुळे विमा रक्कम मिळण्यास उशीर झाला.