महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केळीच्या दरात वाढ, जळगावात उच्चप्रतीच्या केळीला प्रतिक्विंटल १५०० रुपये दर - केळीची दरवाढ बातमी

रावेर आणि यावल हे २ तालुके जळगाव जिल्ह्यातील केळीचे आगार असलेले तालुके म्हणून ओळखले जातात. सर्वाधिक केळी लागवड याच तालुक्यांमध्ये होते. सध्या केळीला चांगला दर मिळत आहे. मात्र, आता शेतकऱ्यांकडे माल शिल्लक नाही.

केळीची बाग

By

Published : Aug 29, 2019, 3:28 PM IST

जळगाव - सध्या व्रतवैकल्यांचा काळ सुरू असल्याने केळीची मागणी वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत आवश्यक तेवढा माल निघत नसल्याने केळीचे दर वाढले आहेत. जळगाव विभागातील उच्चप्रतीच्या केळीला यावर्षीच्या हंगामातील सर्वोच्च दर मिळत आहेत. सध्या केळीला प्रतिक्विंटल १ हजार २५० रुपयांपासून १ हजार ५०० रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत.

केळीच्या दरांबाबत माहिती देताना केळी उत्पादक शेतकरी

जळगाव जिल्ह्यातील तापी-पूर्णा, सुकी, मोर, अनेर, गिरणा आणि वाघूर या नद्यांच्या प्रदेशात केळी लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यापैकी सर्वाधिक लागवड ही रावेर तसेच यावल तालुक्यात होते. त्या खालोखाल लागवड चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यात होते. जिल्ह्याच्या एकूण साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ५० ते ५५ हजार हेक्टरवर केळी लागवड होते. त्यात रावेर-यावल मिळून ३० ते ३५ हजार तर चोपडा व मुक्ताईनगर मिळून १५ ते २० हजार हेक्टरचा समावेश आहे. सध्या व्रतवैकल्यांचा काळ सुरू आहे. तसेच उत्तर भारतातील जम्मू, काश्मीर, श्रीनगर, दिल्ली, पंजाबमधील हरियाणा आणि चंदीगड येथून जळगावच्या केळीला प्रचंड मागणी वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आखाती देशांकडून मागणी वाढल्याने मृगबागेच्या केळीला चांगले दर मिळत आहे. मागणीच्या तुलनेत माल उपलब्ध नसल्याने उच्चप्रतीच्या केळीचे दर प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपयांपर्यंत गेले आहेत. सध्या रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवतीच्या केळीला १ हजार ३७० रुपये प्रतिक्विंटल (फरक २० रुपये), पिलबागच्या केळीला १ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल (फरक २० रुपये) तर वापसीच्या केळीला ८९० ते ९५० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळत आहेत. नवतीच्या केळीला प्रतिक्विंटलमागे मिळणारा २० रुपयांचा फरक लक्षात घेता हा दर १ हजार ५०० रुपयांपर्यंत जात आहेत.

जिल्ह्यातील रावेर आणि यावल हे २ तालुके केळीचे आगार म्हणून ओळखले जातात. सर्वाधिक केळी लागवड याच तालुक्यांमध्ये होते. सध्या केळीला चांगला दर मिळत आहे. मात्र, आता शेतकऱ्यांकडे माल शिल्लक नाही. दोन्ही तालुक्यातील ८० ते ८५ टक्के केळीची कापणी उरकली आहे. केवळ १५ ते २० टक्के शेतकऱ्यांकडे माल आहे. त्यामुळे वाढलेल्या दरांचा फायदा बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनाच होत आहे. वाढलेल्या दरांचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक होताना दिसतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील केळीला चांगली मागणी आहे. मात्र, यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला चक्रीवादळामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्यातक्षम केळी उपलब्ध होणार नाही. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

यावर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांवर सातत्याने नैसर्गिक आपत्ती कोसळत आहे. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी चक्रीवादळामुळे हजारो हेक्टरवरील केळी उद्ध्वस्त झाली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे निसवणीवर आलेली केळी जमीनदोस्त झाली. या संकटातून बोटावर मोजता येतील इतके शेतकरी वाचले. आता त्यांना केळीच्या वाढीव दरांचा फायदा होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details