जळगाव- केळी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भूगर्भातील जलपातळी खाली गेली आहे. तापी नदीच्या गाळाच्या प्रदेशात जलपुनर्भरण न झाल्यामुळे जळगाव, रावेर, यावल, चोपडा, तसेच मुक्ताईनगर तालुक्यात केळी पिकाला घटलेल्या भूजलपातळीचा मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टरवरील केळी बागा करपल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळी पट्ट्यातील तालुक्यांमध्ये भूगर्भातील जलपातळी सरासरी 15 मीटरवरून 32 मीटरवर गेली आहे. यामुळे या परिसरातील 100 फुटांपर्यंत असलेल्या विहिरींनी पहिल्यांदाच तळ गाठला आहे. विशेष म्हणजे, दीडशे ते दोनशे फुटावर पाण्याचा स्रोत मिळणाऱ्या कूपनलिकांना सातशे ते हजार मीटर खोदूनही भूगर्भात पाणी मिळत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील केळीच्या बागा कारपल्या आहेत. जळगाव, यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यांना तापी नदीच्या पाण्याचा बागायती केळीसाठी फायदा होतो. मात्र, केळी पिकासाठी सातत्याने भूगर्भातील पाणीसाठा उपसण्यात आला. तुलनेने जलपुनर्भरणाचे प्रयोग न केले गेल्यामुळे या परिसरातील भूगर्भातील जलपातळी खालावल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.