जळगाव - 'खानदेशचा कॅलिफोर्निया' अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातील 'बनाना बेल्ट'ची दुष्काळ आणि अतिउष्ण तापमानामुळे रया गेली (खराब होणे) आहे. दुष्काळामुळे घटलेली भूजल पातळी आणि सरासरी ४५ अंशापेक्षा जास्त तापमानामुळे जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी धोक्यात आली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारणच अडचणीत आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील तापी-पूर्णा, सुकी, मोर, अनेर, गिरणा आणि वाघूर या प्रमुख नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक लागवड ही जळगाव, रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यात होते. गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी दुष्काळाचे संकट ओढवले. एकीकडे शेतकरी दुष्काळाचा सामना करत असतानाच दुसरीकडे तापमान वाढीने अक्षरशः कहरच केला. अतिउष्ण तापमानाचा फटका केळी बागांना बसत आहे. मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमान ४२ ते ४६ अंशांदरम्यान स्थिरावत असल्याने नवतीच्या (नव्याने लागवड केलेली बाग) केळीच्या बागा करपून गेल्या आहेत. त्याचप्रमाणे पिलबागांचे (दुबार बहर असलेली बाग) निसवणीवर आलेले केळीचे घड तुटून नुकसान होत आहे. काही बागांमध्ये केळीचे खोड मधून तुटून पडत आहेत. उष्णतेची लाट कायम राहिली तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेकडो कोटींचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.